कष्टाची पर्वा न करता ज्ञानसंपन्न व्हावे
By Admin | Updated: September 27, 2014 23:08 IST2014-09-27T23:02:21+5:302014-09-27T23:08:09+5:30
शेवगाव : विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन ज्ञान संपन्न व्हावे, असे आवाहन कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे यांनी केले.

कष्टाची पर्वा न करता ज्ञानसंपन्न व्हावे
शेवगाव : शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानाची उत्तुंग साधना करताना विद्यार्थ्यांनी येणाऱ्या कष्टाची पर्वा न करता अभ्यास करुन ज्ञान संपन्न व्हावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे यांनी केले.
शेवगाव येथील न्यू आर्टस, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयात आयोजित इंग्रजी,राज्यशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र या पाच विषयांच्या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन कुलगुरु डॉ. चोपडे, विश्वास आठरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू चोपडे म्हणाले, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थी, प्राध्यापकांनी संशोधन करावे नव्हे तर विद्यार्थी संशोधक बनला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या चर्चासत्राच्या निमित्ताने संशोधनाच्या दिशा, महत्व आणि प्रगतीचा आढावा देत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण मतकर यांनी केले. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या ‘तृषार्त’ या नियतकालिकाचे व प्रा. सारीका पाचारणे लिखीत ‘संत दर्शन’ या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास पुणे विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. जी. चासकर, डॉ. सुनील कवडे, प्रा. पांचाळ, डॉ. बी.के. खोत तसेच संशोधक, विद्यार्थी हजर होते. प्राचार्य डॉ. मतकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शेंडगे, प्रा. सी.के. भालशंकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य आर.के. कासार यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)