विडी कामगारांचा मोर्चा
By Admin | Updated: April 9, 2016 23:41 IST2016-04-09T23:37:11+5:302016-04-09T23:41:12+5:30
अहमदनगर : विडी बंडलवरील ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, बंद असलेले विडी कारखाने पूर्ववत सुरू करावे व विडी कामगारांना कामाची भरपाई म्हणून मजुरी मिळावी,

विडी कामगारांचा मोर्चा
अहमदनगर : विडी बंडलवरील ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, बंद असलेले विडी कारखाने पूर्ववत सुरू करावे व विडी कामगारांना कामाची भरपाई म्हणून मजुरी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन व नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने शनिवारी (दि़ ९) पालकमंत्री राम शिंदे यांच्या सावेडी येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़
विडी कामगार, महिलांनी पालकमंत्री यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी कॉ. शंकर न्यालपेल्ली, कॉ. सुभाष लांडे, शंकरराव मंगलारप, अॅड. सुधीर टोकेकर, चंद्रकांत मुनगेल, शोभा बिमन, शारदा बोगा, कमलाबाई दोंता, शशिकला कोंडा, सुमित्रा जिंदम, ताराबाई दासर, लक्ष्मी कोडम, सरोजनी दिकोंडा, लिलाताई भरताल आदी उपस्थित होते.
विडी बंडलवरील ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, या मागणीसाठी १ एप्रिलपासून पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे विडी कामगारांवर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे़ विडी कारखाने पूर्ववत सुरु व्हावे व विडी कामगारांना कामाची भरपाई म्हणून मजुरी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देशात व राज्यात विडी उद्योगात ७५ लाख विडी कामगार आहेत. यामध्ये तेंदूपत्ता तोडणारे मजूर, तंबाखू उत्पादक शेतकरी व छोटे विडी विक्रीवाले यांच्यासह दीड कोटी लोकांचे जीवन विडी उद्योगावर अवलंबून आहे. केंद्र सरकारने विडीवर विविध बंधने व अटी लादताना या ७५ लाख विडी कामगारांचा विचार करणे गरजेचे आहे. विधानसभेत विडी कामगारांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. विडी कामगारांच्या रोजगाराच्या दृष्टीने राज्यशासनाची सकारात्मक भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)