बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:50+5:302021-06-09T04:25:50+5:30

अहमदनगर : रुंद सरी, वरंबा म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती मशागत, पीक पेरणी, जास्त उत्पादन घेणे शक्य ...

BBF technology a boon for farmers | बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

अहमदनगर : रुंद सरी, वरंबा म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती मशागत, पीक पेरणी, जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. या यंत्राद्वारे विविध १८ पिकांची पेरणी होऊ शकते, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी यांनी सांगितली.

उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर, पारनेर, पाथर्डी या तीन तालुक्यांत बीबीएफ पेरणी यंत्राबाबत मार्गदर्शन कार्यशाळा सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून कृषी विभाग व श्रीनाथ ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने बीबीएफ यंत्राद्वारे विविध पिकांची पेरणी आणि त्यातून होणारी उत्पादन वाढ याबाबत एमआयडीसी येथे रविवारी (दि. ६) शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, श्रीनाथ ॲग्रोचे संचालक रमेश ताठे यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगितली. यावेळी कर्जुने खारे येथील कृषी मित्र राजूभाई सय्यद, जय मातादी कृषी गटाचे दत्तात्रय शेळके, विकास निमसे, रोहित शेळके, इसळक येथील कृषी मित्र संतोष गेरंगे, गोसावी बाबा कृषी गटाचे भाऊराव गायकवाड, राहुल गायकवाड, शिंगवे नाईकचे उत्तम जाधव, अनिल खताळ, नांदगावचे रामदास पुंड, सुंदर जाधव, उद्धव मोरे, पिंपळगाव माळवीचे सुनील गायकवाड, श्रावण रासकर, छबू लहारे आदी उपस्थित होते.

.......................

रुंद सरी, वरंबा (बीबीएफ)चे फायदे

पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा दीर्घकालीन लाभ होतो. अधिक पाऊस झाल्यास निचरा होण्यास रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यांमुळे मदत होते. चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात. वरंब्यामध्ये हवा खेळती राहते. बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची वाढ जोमदारपणे होते. बीबीएफ यंत्राने आवश्‍यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी कामे करता येतात. एका दिवसात सुमारे ५ ते ७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करता येते. यंत्राद्वारे आंतरमशागतही करता येते, असे सोमवंशी यांनी सांगितले.

..................

हळद, आले पिकाची लागवड शक्य

बीबीएफ यंत्राद्वारे १८ पिकांची पेरणी करता येते. कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी अशा पिकांची पेरणी तर भुईमूग, हरभरा, सोयाबीन, तीळ, हळद, आले अशा पिकांची लागवडही या यंत्राने शक्य आहे. त्याशिवाय सध्याच्या ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्रात थोडेफार बदल करून हे यंत्रही बीबीएफ यंत्रात बदलता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सोमवंशी यांनी सांगितले.

..............

०७ बीबीएफ यंत्र पाहणी

शेतकऱ्यांनी एमआयडीसी येथे बीबीएफ यंत्राची पाहणी करून त्याची उपयुक्तता जाणून घेतली.

Web Title: BBF technology a boon for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.