दोन गावांमधील गौराईची लढाई बरोबरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 19:08 IST2017-08-22T18:48:19+5:302017-08-22T19:08:27+5:30
श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई आज बरोबरीत सुटली. मात्र महिलांची असणा-या या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली.

दोन गावांमधील गौराईची लढाई बरोबरीत
अहमदनगर : श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई आज बरोबरीत सुटली. मात्र महिलांची असणा-या या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली.
आज दोन्ही गावातील महिलांनी आणलेल्या गौराईचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जवळपास अर्धा तास लढाई चालली. पण यात पुरुषांचा हस्तक्षेप इतका वाढला की पोलिसांना यात त्यांना मागे ओढावे लागले. पोलिस बंदोबस्त नसता तर राडा होण्याची चिन्हे दिसत होती. काही तरूणांच्या आपसातील वादाचे ही या लढाईला गालबोट लागले. शेवटी कर्डिले यांच्या हस्ते लढाई बरोबरीत सोडवण्यात आली. पुरुष हस्तक्षेपामुळे लढाई करणा-या महिलांचा हिरमोड झाला. लढाई पाहण्यासाठी आलेल्या महिलांना पुरूषांच्या गदीर्मुळे काहीच दिसत नव्हते.
नगर तालुक्यातील शेंडी व पोखर्डी हि शेजारीशेजारी गावे. या गावांच्या मधून सीना नदी वाहते. नदी हीच या दोन गावांची सीमा आहे. शेंडी-पोखर्डी मधील महिलांमध्ये भांडण, शिव्यांची लाखोली, एकमेकींना खेचाखेची, ओढाओढी अशा प्रकारची एक वैशिट्यपूर्ण परंपरा या दोन गावांनी अनेक वर्षांपासून जतन केली आहे. ती लढाई नगरची आता खास ओळख बनत आहे. ही लढाई म्हणजे दोन गावातील महिलांची स्पर्धा असली तरी त्यात द्वेष भावना नसते. दरवर्षी श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी या दोन गावांमध्ये गौराईची लढाई होत असते.
गौराई म्हणजे पार्वती व शंकराने आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर दोन गावात द्वापर युगात शेवटी लावलेली लढाई आहे. या दिवशी दोन्ही गावातील महिला सूर्यास्ताच्या वेळेला गौराई देवीची पूजा करून सवाद्य मिरवणुकीने नदीकाठी जमतात. तेथे गौराईचे विसर्जन करण्यात येते. मग सुरु होते लढाई. लढाई सुरु होण्यापूर्वी महिला दोन्ही गावांच्या पाटलांच्या नावाने हातवारे करून शिव्याशाप देतात. एकमेकींची उणीदुणी काढतात. बळकट बांध्याच्या महिला पुढे होतात. एकमेकींच्या कमरेला घट्ट पकडून नदीच्या मध्यभागी जमतात. दोन्ही गावातील महिला एकमेकींच्या समोरासमोर उभ्या राहून समोरच्या गावातील महिलेला आपल्या गटाकडे खेचण्यासाठी ओढाओढी करतात. प्रतिस्पर्धी गटातील एखादी महिला आपल्या गटात खेचण्यात जो गट यशस्वी होईल त्या गटातर्फे त्या महिलेची माहेरवाशीण म्हणून गावातून मिरवणुक काढली जाते. दुस-या दिवशी तीला साडी-चोळी देऊन तिच्या गावात परत पाठवले जाते.
पुरुषांचा हस्तक्षेप आणि गालबोट
- गेल्या काही वर्षांपासून महिलांची असणाऱ्या या लढाईत पुरुषांचा हस्तक्षेप वाढत आहे.महिलांच्या लढाईत पुरुषांचा वाढत जाणारा सहभाग या लढाईत गालबोट लागण्यास कारणीभूत ठरत असल्याचे उदाहरण आहेत.यामुळे या दोन गावादरम्यान अनेकदा वादावादीचे प्रसंग उद्भभवले आहेत.यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो .यामुळे या लढाईला गालबोट लागण्याचे प्रसंग घडत आहेत.