अन्सार शेख/चिचोंडी पाटील/ऑनलाइन लोकमत(अहमदनगर), दि. 26 - नगर तालुक्यातील बारादरी अकराशे लोकसंख्या असलेले छोटस गाव. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आसपास निसर्गरम्य परिसर व डोंगराळ भाग आहे. या गावातून तब्बल १५ ते २० मुले आर्मीत देशसेवेसाठी भरती झाले आहेत. तर ७० ते ८० मुले पोलीस दलात कार्यरत आहेत. या गावातील काही कुटुंब वगळता प्रत्येक कुटुंबातील एक ते दोन असे व्यक्ती पोलीस व आर्मीत कार्यरत आहेत. त्यामुळे हे गाव आता पोलीस दादाचं गाव म्हणून पुढे येऊ लागले आहे. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मोकळे मैदान, त्याचबरोबर बारादरी गाव ते चाँदबीबी महाल या दरम्यान जो डांबरी रस्ता आहे, यावरून वाहतूक कमी असल्याने मुलांना धावण्यासाठी उपयोगी ठरत आहे. मागील पाच वर्षांत गावातील सर्वाधिक मुले पोलीस भरती झाली आहेत. या गावातील पोलीस नाईक दत्तात्रय पोटे, युवराज पोटे, संजय पोटे, राम पोटे, गणेश पोटे, सचिन पोटे हे तरुण सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. हे सर्व सुट्टीला आल्यानंतर गावातील तरुणांना एकत्र करुन पोलीस दलाविषयी माहिती व पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करतात. वेळप्रसंगी तरुणांना शिक्षा देऊन त्यांच्याकडून मैदानी व बुद्धिमत्ता चाचणीची तयारीही करुन घेतात. हे तरुण येथील युवकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. यामुळे गावातील मुलेही पोलीस दलात तसेच आर्मी भरतीसाठी आकर्षित झाले आहेत. या गावातील अनेक तरुण पोलीस दलात कार्यरत असल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटल्याचे समोर आले आहे.बारादरी गावातील अनेक तरुण पोलीस दलात आहेत. मतदानासाठी गावाकडे येता यावे, असे सर्वांना वाटते, अन्यथा त्यांना पोस्टाने आपले मतदान करता यावे, असे काही उपाय सुचवले पाहिजेत. हे तरुण देशसेवेसाठी काम करतात त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. -सुधीर पोटे, सरपंच ..आम्ही गावात तरुणांचे दहा ते पंधरा जणांचा ग्रुप तयार करण्यास सांगतो. जर अभ्यास करताना काही अडचणी आल्या तर त्या ग्रुपद्वारे ते सोडवणे सोपे जाते. आम्ही २०१० साली असाच ग्रुप तयार केला होता. आम्ही त्या वर्षी बारा मुले पोलीस दलात भरती झालो होतो. यंदाही अनेक मुले भरती होतील. -दत्तात्रय पोटे, पोलीस नाईक
बारादरी गाव बनलं पोलीस दादांच गाव!
By admin | Updated: February 26, 2017 16:38 IST