सोशल मीडियावर शिक्षक बॅँक ‘व्हायरल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 23:41 IST2016-01-17T23:39:28+5:302016-01-17T23:41:25+5:30

अहमदनगर : शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, आतापासून सत्ताधारी विरोधात विरोधकांचे सोशल मीडियावर ‘वॉर’ सुरू झाले आहे.

Bank 'Viral' on social media | सोशल मीडियावर शिक्षक बॅँक ‘व्हायरल’

सोशल मीडियावर शिक्षक बॅँक ‘व्हायरल’

अहमदनगर : शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, आतापासून सत्ताधारी विरोधात विरोधकांचे सोशल मीडियावर ‘वॉर’ सुरू झाले आहे. रविवारी बँकेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले असल्याची बातमी प्रसिद्ध होताच शिक्षक सभासदांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, यात सामान्य शिक्षक सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
पाच वर्षांपूर्वी बँकेच्या निवडणुकीत गुरुकुल मंडळाचा मोठ्या फरकाने पराभव करत सदिच्छा मंडळ सत्तेत आले. त्यावेळी सदिच्छा मंडळाच्या नेत्यांनी बँकेचा कारभार काटकसरीने करण्याचे अभिवचन सभासदांना दिले होते. मात्र, वर्षभराच्या आत सदिच्छा मंडळात फूट पडली आणि संचालक रावसाहेब रोहकले बाहेर पडले. विद्यमान संचालक मंडळ आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत नव्याने गुरु माउली मंडळाची स्थापना त्यांनी केली. दरम्यानच्या काळात बँकेचा लाभांश कमी होत अवघ्या १ टक्क्यांपर्यंत पोहोचला. विद्यमान संचालकांनी या परिस्थितीला गुरुकुल मंडळाचा कारभार जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण दिले. गत चार वर्षात झालेल्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये झालेल्या राड्यामुळे सामान्य शिक्षकांची जिल्हाभर बदनामी झाली. आता तर निवडणूकच होणार असल्याने सर्व मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिगत भेटीगाठींसोबत शिक्षक नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. बँकेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याच्या बातमीवर शिक्षकांच्या अनेक व्हॉट्सअप गु्रपवर साधकबाधक चर्चा पहावयास मिळाली. यातून यंदा शिक्षक सभासद जागरुक असून त्याचा परिणाम उद्याच्या बँकेच्या निवडणुकीत पहावयास मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
व्हॉट्सअप गु्रपवरील प्रतिक्रियेत बँक आयएसओ झाली. बँक ही सेवा देणारी संस्था असून आयएसओमुळे तिचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे. सहकारी संस्थेला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल संचालकांचे अभिनंदन. आयएसओच्या नावाखाली प्रत्येक संचालकाला प्रत्येकी दहा लाख रुपये मिळाले, सभासदांना काय मिळाले. आधी शाळा आयएसओ झाल्या, आता बँक आयएसओ झाली, लवकरच शिक्षकांची घरेही आयएसओ होणार आहेत. बँक आयएसओ झाल्याचा सभासदांना फायदा काय? सदिच्छा मंडळाच्या नेत्यांनी आधी त्यांच्या शाळा आयएसओ केल्या, आता बँकही आयएसओ झाली, धन्य सदिच्छा मंडळ, अशी चर्चा दिवसभर सुरू होती.
शिक्षकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न ठेवीत दुप्पट वाढ झाली तर सत्ताधाऱ्यांनी १२०० रुपयांची ठेव घेणे बंद करावे. कर्जावरील व्याजदर ८ टक्के करावे. स्वभांडवली बँकेने मध्येच कर्ज पुरवठा का बंद केला होता? बँकेचा राखीव निधी कोणाच्या घशात गेला. पाच वर्षे माना खाली घालणारे संचालक मंडळ आता सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रातून जागे झाले आहे.
शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने पाच वर्षांत कधीही बँकेचे हित जोपासले नाही. आयएसओच्या नावाखाली बँकेत पैसे लाटण्याचे काम सुरू आहे. छोट्या-छोट्या सुधारणा दाखवून सभासदांच्या खिशाला कात्री लावली आहे. सभासद सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही. - मीना जाधव, शिक्षिका, अकोले
शिक्षक बँकेला आयएसओ प्रमाणपत्र कसे मिळाले, हा संशोधनाचा विषय आहे. पारनेर शाखेत कोणतीही सुविधा नसताना आयएसओ मिळाळेच कसे, हे सामान्य सभासदांना समजलेले आहे. बँकेच्या संचालक मंडळाने सत्तेसाठी काहीही खोटेनाटे करू नये.-वनिता सुंबे, गुरु माउली पदाधिकारी, पारनेर.

Web Title: Bank 'Viral' on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.