श्रीगोंद्यात दगडाने ठेचून बंगाली डॉक्टराचा खून
By Admin | Updated: April 5, 2017 15:39 IST2017-04-05T15:39:23+5:302017-04-05T15:39:23+5:30
शेतात घास आणण्यासाठी गेलेल्या बंगाली डॉक्टराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

श्रीगोंद्यात दगडाने ठेचून बंगाली डॉक्टराचा खून
आॅनलाईन लोकमत
काष्टी (अहमदनगर), दि़ ५ - शेतात घास आणण्यासाठी गेलेल्या बंगाली डॉक्टराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नव्हते.
विपुल दे (वय ४२) हे मयत डॉक्टराचे नाव आहे. मयत विपुल दे बंगाल प्रांतातील डॉक्टर होते. सुमारे बारा वर्षापूर्वी त्यांनी कौठा येथे दवाखाना सुरु केला होता. कौठा परिसरात त्यांनी शेतीही खरेदी केली होती. त्यांच्याकडे काही जनावरेही होती. नेहमीप्रमाणे जनावरांना घास आणण्यासाठी ते शेतात गेले होेते. यावेळी शेतातच त्यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून खून केला. पोलिसांना घटनास्थळी गुन्ह्यात वापरलेला दगड सापडला.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मयत डॉक्टराच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नसला तरी यामागे नाजूक कारण असावे, असा पोलिसांना संशय आहे.