बबनराव पाचपुतेंकडून बनवाबनवीचा कळस
By Admin | Updated: September 19, 2014 23:39 IST2014-09-19T23:21:45+5:302014-09-19T23:39:11+5:30
श्रीगोंदा : पाचपुतेंच्या कारखान्याने ठिबक सिंचन २० कोटींचे कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते थकविले आहे.

बबनराव पाचपुतेंकडून बनवाबनवीचा कळस
श्रीगोंदा : तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्याने सुमारे ७ हजार शेतकऱ्यांच्या नावावर ठिबक सिंचन २० कोटींचे कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते थकविले आहे. भविष्यात कर्जापायी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण? असा सवाल कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
जगताप पुढे म्हणाले, पाचपुतेंनी शरद पवारांच्या स्वप्नातील हिरडगावच्या माळरानावर इंटीग्रेटेड शुगर प्रकल्प उभा केला. ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाचे बिल वर्ग करणेपर्यंत प्रसिद्धीचा गाजावाजा करताना बनवाबनवीचा कळस केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर दिली नाही. काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली. कामगारांना वेतन नाही. शिवाय ऊस वाहतुकदारांचे कमिशन दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी, ऊस वाहतूकदार कामगार यांच्यावर मोठा अन्याय झाला मात्र पाचपुतेंकडे सत्ता सामर्थ्य असल्याने तक्रारी करून देखील संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. आपल्यावर कुकडी साखर कारखान्याची कमी वयात जबाबदारी पडली.
संचालक मंडळास विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देताना कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले आणि दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी मदत, रस्ते बंधाऱ्याची कामे कुकडी कारखान्याच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत याचे मनात समाधान आहे.
(तालुका प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मैदानात कितीही उमेदवार उतरले तरी तरुण मित्रांच्या पाठबळावर लढाई जिंकणार, असा विश्वास जगताप यांनी शेवटी व्यक्त केला.