अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेची खंडपीठात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:18+5:302021-01-08T05:05:18+5:30

हत्येच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बोठे याने जिल्हा न्यायालयात ७ डिसेंबर रोजी अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन ...

Bal Bothe ran to the bench for pre-arrest bail | अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेची खंडपीठात धाव

अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेची खंडपीठात धाव

हत्येच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी बोठे याने जिल्हा न्यायालयात ७ डिसेंबर रोजी अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर बोठे याने ३१ डिसेंबर रोजी ॲड. संतोष जाधवर यांच्या माध्यमातून खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याचे ॲड. जाधवर यांनी सांगितले. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र गेल्या महिनाभरापासून फरार आहे.

स्टँडिंग वाॅरंटला आव्हान

शोध घेऊनही सापडत नसल्याने बोठे याला फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला बोठे याने आव्हान दिले आहे. त्याने ॲड. संकेत ठाणगे यांच्या माध्यमातून हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमाेर सुनावणी झाली. यावेळी बोठे याच्यावतीने ॲड. ठाणगे यांनी युक्तिवाद केला की, बोठे याचा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात अर्ज करण्यात आला आहे. यावर निर्णय होण्याआधीच

पोलिसांनी स्टँडिंग वाॅरंटसाठी अर्ज केला आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बोठे हा अटक टाळत नसून जामीनासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिसांचा स्टँडिंग वॉरंटचा अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद ॲड. ठाणगे यांनी केला. दरम्यान, या अर्जावर बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bal Bothe ran to the bench for pre-arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.