बाळ बोठेच्या पत्नीची जरे यांच्या अंगरक्षकास अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:04+5:302021-07-29T04:22:04+5:30
अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या मयत रेखा जरे यांचे पुत्र कुणाल जरे यांच्या अंगरक्षकास पारनेर पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपी बाळ ...

बाळ बोठेच्या पत्नीची जरे यांच्या अंगरक्षकास अरेरावी
अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या मयत रेखा जरे यांचे पुत्र कुणाल जरे यांच्या अंगरक्षकास पारनेर पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपी बाळ बोठे याच्या पत्नी सविता बोठे यांनी अरेरावी केली आहे. तशी तक्रार कुणाल जरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी सविता बोठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी बाळ बोठे अटकेत असून, सध्या त्याला पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यापासून त्यांचे पुत्र कुणाल यांना सुरक्षेसाठी अंगरक्षक आहे. कुणाल हे मंगळवारी (दि. २७) कोर्ट कचेरीच्या कामासाठी पारनेर येथील पोलीस ठाण्याच्या आवारात अंगरक्षकासह गेले होते. यावेळी हा प्रकार घडला आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत कुणाल यांनी म्हटले आहे की, पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या सविता बाळ बोठे यांनी कुणाल जरे यांचा अंगरक्षक पोलीस ठाण्याच्या परिसरात का फिरतो आहे? कोणाच्या आदेशाने तो पारनेर पोलीस ठाण्यात फिरतोय? असे म्हणत अंगरक्षकाचा एकेरी भाषेत उल्लेख करून अरेरावी करून कुणाल यांना मोठ्या आवाजात धमकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बाळ बोठे हा जेलमध्ये असला तरीही पत्नी सविता बोठे या कोणाच्याही मदतीने काटा काढू शकतात. तसेच त्या धमकाविण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सदरचे पत्र बुधवारी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.