महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी बाबासाहेब वाकळे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:05+5:302021-07-14T04:24:05+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या विरोधीपक्षनेते पदाचे पत्र भाजपाचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना मंगळवारी अत्यंत गोपनियरीत्या प्रदान करण्यात ...

महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी बाबासाहेब वाकळे ?
अहमदनगर : महापालिकेच्या विरोधीपक्षनेते पदाचे पत्र भाजपाचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना मंगळवारी अत्यंत गोपनियरीत्या प्रदान करण्यात आले. परंतु, या नियुक्तीचा महापौर रोहिणी शेंडगे यांनी इन्कार केला आहे. दरम्यान, या नियुक्तीबाबत भाजपच्या वरिष्ठांनी हस्तक्षेप करत नगरसेवकांची शुक्रवारी मुंबईत बैठक बोलविली आहे, तर दुसरीकडे महापौरांनी ही नियुक्ती कुणाच्या सांगण्यावरून केली? असा सवाल शिवसेनेतील वरिष्ठ करीत असल्याने सेनेत नवा वाद निर्माण झाला आहे.
महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आहेत. भाजप सर्वात मोठा विरोधीपक्ष आहे. भाजपने विरोधीपक्षनेते पदावर दावा केला आहे. तसे पत्र भाजपच्या गटनेत्या तथा उपमहापौर मालन ढोणे यांनी सोमवारीच महापौरांना दिले होते. या पत्रात त्यांनी कुणाच्याही नावाची शिफारस केलेली नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोधीपक्षनेतेपदी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचीच नियुक्ती करावी, असे पत्र महापौरांना दिले. हे पत्र दिल्यानंतर काहीवेळातच महापौर शेंडगे यांनी माजी महापौर वाकळे यांना विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी भाजपचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. सेनेकडून माजी शहरप्रमुख संभाजी कदम व महापौर रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे हे दोघेच उपस्थित होते. विरोधीपक्षनेते पदी वाकळे यांच्या नियुक्तीची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. विरोधीपक्षनेते पदासाठी भाजपकडून नगरसेवक तथा शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे हेही इच्छुक होते. परंतु, अचानक वाकळे यांची विरोधीपक्षनेते पदी नियुक्ती झाल्याने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. ही बातमी वरीष्ठांपर्यंत पोहोचली. प्रदेशाध्यक्षांचा फोन खणखणला. त्यांनी वाकळे यांच्याशी संपर्क करून ही नियुक्ती थांबवा. तसेच याबाबत कुठलीही प्रसिद्धी करू नका, असे वरिष्ठांकडून वाकळे यांना सांगितल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पातळीवरून अशी वेगाने चक्रे फिरल्याने वाकळे यांच्या नियुक्तीबाबत अत्यंत गोपनियता पाळली गेली आहे. यावर आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय देतात, यावर वाकळे यांचे पद अवलंबून आहे.
....
एका हॉटेलमध्ये खडाजंगी
विरोधीपक्षनेते पदी नियुक्ती केल्याचे पत्र वाकळे यांना दिल्यानंतर एका हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे उपस्थित होते. त्यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. विरोधीपक्षनेते पदासाठी इच्छुक असलेल्यांनी वाकळे यांच्या निवडीवर जोरदार अक्षेप घेतला.
...
सेनेत दुफळी
गतवेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विरोधीपक्षनेते पदाचे पत्र राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांना दिले. त्यामुळे सेनेला विरोधीपक्षनेते पदही मिळू शकले नाही. या कारणामुळे सेनेचे नगरसेवक वाकळे यांच्यावर नाराज आहेत. तसेच सेनेच्या नगरसेवकांशी चर्चा न करता माजी शहरप्रमुख कदम व महापौरांचे पती संजय शेंडगे यांनी विरोधीपक्षनेते पदी वाकळे यांची नियुक्ती केली. यावरून सेनेतही दुफळी निर्माण झाली असल्याचे समजते.
----------------------
- विरोधीपक्षनेते पदासाठी भाजपकडून मागणी करण्यात आलेली आहे. परंतु, नियुक्तीचे पत्र अद्याप कुणालाही दिलेले नाही. वरिष्ठांशी चर्चा करून नियुक्ती पत्र देण्यात येईल.
- रोहिणी शेंडगे, महापौर
....
- विरोधीपक्षनेते पदी नियुक्ती केल्याचे पत्र आपल्याला दिलेले नाही. याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.
- बाबासाहेब वाकळे, माजी महापौर