बाबासाहेब पवार यांचे निधन
By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:24:13+5:302014-09-28T23:27:52+5:30
जामखेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब निवृत्ती पवार (वय ८०) यांचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

बाबासाहेब पवार यांचे निधन
जामखेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब निवृत्ती पवार (वय ८०) यांचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेल्या ५५ वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. संघर्षशील नेतृत्व म्हणून ते जिल्ह्यात परिचित होते.
दिवंगत बाबासाहेब पवार यांनी जामखेड तालुक्यातील नान्नजसारख्या ग्रामीण भागातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. नान्नज गावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती म्हणून तालुक्यात वलय निर्माण केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून २४ वर्षे काम केले. याच दरम्यान जि.प. अध्यक्ष होण्यासाठी त्यांना स्वपक्षाशी संघर्ष पत्करावा लागला होता. त्यात ते यशस्वी झाले. जिल्हा दूध संघाचे संचालक व अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. जिल्हा दूध संघाच्या विभाजनानंतर त्यांनी तालुका दूध संघाची स्थापना करून जिल्ह्यात संघाला मानाचे स्थान मिळवून दिले.
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून १९९० च्या सुमारास तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना नान्नज येथे नंदादेवी नावाने काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या उपस्थितीत शेअर्सची विक्री करण्यात आली. मात्र मर्यादित शेअर्स विक्री झाल्याने कारखाना उभा करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. बाबासाहेब पवार यांच्या मागे मुलगा तुषार पवार व चार मुली, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या स्नुषा वंदना पवार जिल्हा बँकेच्या संचालिका आहेत.
(तालुका प्रतिनिधी)