१४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:04+5:302021-01-23T04:21:04+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत १८ ठिकाणी १८ विविध पक्ष्यांची मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी ...

१४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत १८ ठिकाणी १८ विविध पक्ष्यांची मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता, आतापर्यंत त्यातील चार अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित १४ पक्ष्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बर्ड फ्लू पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या परिसरात प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंबारे उपस्थित होते. गडाख म्हणाले की, नगर जिल्ह्यात एकूण ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्म असून, त्यात १ कोटी १४ लाख मांसल कोंबड्या, ७६ हजार अंडी देणाऱ्या कोंबड्या व सुमारे ८९ लाख परसातील कोंबड्या अशा एकूण पावणेतीन कोटी कोंबड्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८ ठिकाणी कोंबड्या व कावळे, कबुतर, बुलबुल, भारद्वाज असे पक्ष्यांची मृत्यू झाले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, चार अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळा व चिचोंडी येथील कोंबडीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, मिडसांगवी व निंबळकचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अन्य ठिकाणचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. चिंचोडी येथील कोंबड्यांमध्ये एच ५ एन ८ हा विषाणू आढळला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाॅझिटिव्ह आलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, असे गडाख यांनी सांगितले.
---------
नुकसानभरपाई देणार
पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या चिचोंडी पाटीलच्या एक किलोमीटर भागातील कोंबड्या, अंडी व पशुखाद्य याची प्रशासन शुक्रवारी विल्हेवाट लावणार आहे. त्यासाठी शासन निर्णयमाप्रमाणे कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे माहिती पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. तुंबारे यांनी सांगितली.
----------
अंडी, चिकन खाण्यास सुरक्षित
बर्ड फ्लू हा कोंबड्यांचा घटक आजार असला तरी भारतात अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीला या रोगाची लागण झालेली नाही. बर्ड फ्लूचा विषाणू ७० सेंटिग्रेड तापमानात तीन सेकंदात मरतो. त्यामुळे अंडी, कोंबड्या शिजवून खाण्यास हरकत नाही, असे डाॅ. तुंबारे यांनी सांगितले.