संतप्त ग्रामस्थांकडून शाळेला टाळे
By Admin | Updated: September 20, 2015 00:50 IST2015-09-20T00:36:57+5:302015-09-20T00:50:17+5:30
पारनेर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तीन महिन्यांपासून मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे.

संतप्त ग्रामस्थांकडून शाळेला टाळे
पारनेर : तालुक्यातील दुर्गम व आदिवासी गाजदीपूर येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तीन महिन्यांपासून मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे.
टाकळीढोकेश्वर पलिकडील वडगाव सावताळपासून चार ते पाच कि.मी अंतरावर गाजदीपूर हे दुर्गम गाव आहे. या गावात पहिली ते पाचवीपर्यंत सुमारे ९९ विद्यार्थ्यांचा पट आहे. मात्र येथे दोनच शिक्षक गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत असून त्यांना आणखी एक शिक्षकाची गरज आहे. ग्रामस्थांनी गेल्या तीन महिन्यांपासून गटशिक्षणाधिकारी, नगर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करून शिक्षक देण्याची मागणी केली, परंतु अद्याप शिक्षक आले नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शनिवारपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तम नऱ्हे, रामदास कोळेकर यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी आवडा करगळ, भाऊसाहेब सातकर, अप्पासाहेब तिखुळे, बाळासाहेब सातकर, गुलाब पवार, दादाभाऊ नऱ्ही, अंकुश ढेकळे एकत्र झाले व शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुुलूप ठोकले. यावेळी आपण शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे हा निर्णय घेऊ नका, असे सुभाष मगर व संदीप नवले असे या शिक्षकांनी सुचविले. परंतु ग्रामस्थांनी आमच्या मुलांना दोनच शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी संख्या जास्त आहे. मग त्यावेळी नुकसान होत नाही का? असा प्रश्न केला. मग आमच्या मागण्यांची दखल जिल्हा परिषद घेणार केव्हा? असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी सतीश तिखुळे, रामदास सातकर, सुभाष करगळ, किरण काळे, अप्पासाहेब सातकर, अंकुश ढेकळे, अशोक कोळपे, दत्तोबा तिखुळे, चंद्रकांत झिटे, खंडू कोळेकर, लिंबा तिखुळे आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)