जिल्हा बँकेसाठी शांततेत सरासरी ९८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:40 IST2021-02-21T04:40:08+5:302021-02-21T04:40:08+5:30
जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सोसायटी मतदारसंघाच्या ३, तर बिगरशेती मतदारसंघातील एक अशा ...

जिल्हा बँकेसाठी शांततेत सरासरी ९८ टक्के मतदान
जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सोसायटी मतदारसंघाच्या ३, तर बिगरशेती मतदारसंघातील एक अशा चार जागांसाठी शनिवारी मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. सोसायटी मतदारसंघासाठी नगर, पारनेर व कर्जतमध्ये मतदान केंद्र होते, तर बिगशेती मतदारसंघासाठी जिल्हाभरातील केंद्रांवर मतदारांनी मतदान केले.
नगर सोसायटी मतदारसंघात एकूण १०९ मतदार होते. त्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, तर महाविकास आघाडीकडून सत्यभामाबाई भगवानराव बेरड मैदानात होत्या. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून कर्डिले यांच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे येथे चुरस पाहायला मिळाली.
पारनेर सोसायटी मतदारसंघात एकूण १०५ मतदार होते. येथेही १०० टक्के मतदान झाले. येथे महाविकास आघाडीकडून उदय शेळके, तर भाजपकडून रामदास भोसले मैदानात होते. उदय शेळके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी माघार घेतली होती. उदय शेळके यांच्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने मोठी ताकत उभा केली आहे. त्यामुळे या निकालाबाबत उत्सुकता आहे.
कर्जत तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात एकूण ७४ पैकी ७३ मतदारांनी मतदान केले. येथे महाविकास आघाडीकडून मीनाक्षी साळुंके, तर भाजपचे अंबादास पिसाळ यांच्यात लढत झाली. पिसाळ हे विखे समर्थक, तर साळुंके हे थोरात समर्थक आहेत. साळुंके त्यांच्यामागे महाविकास आघाडीने ताकद लावली आहे. शिवाय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ असल्याने त्यांनीही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
-----------
गायकवाड-पानसरेंमध्ये चुरस
बिगरशेती मतदारसंघात एकूण १३७६ मतदार असून, त्यापैकी १३४१ (९७.४६ टक्के) मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक चुरस या मतदारसंघात पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड व भाजपचे दत्ता पानसरे यांच्यात चुरशीची लढत झाली. गायकवाड यांच्यासाठी आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप यांनी माघार घेतली होती. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी नेत्यांनी कंबर कसली आहे. पानसरे यांच्यामागे खासदार सुजय विखे यांनी ताकद उभी करत विरोधकांना आव्हान दिले आहे.