सरासरी ११ मि़ मी़ पाऊस
By Admin | Updated: July 31, 2014 00:40 IST2014-07-30T23:28:02+5:302014-07-31T00:40:00+5:30
अहमदनगर : पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसाने मुळा व भंडारदरात पाण्याची आवक सुरू झाली आहे़

सरासरी ११ मि़ मी़ पाऊस
अहमदनगर : पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसाने मुळा व भंडारदरात पाण्याची आवक सुरू झाली आहे़ मात्र जिल्ह्यातील पावसाची स्थिती जैसे थे असून, सरासरी ११ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ अकोले तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे़
जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस येत असतो़ मात्र जून व जुलैमध्ये पाऊस झाला नाही़ पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली होती़ त्यामुळे वरदान ठरणाऱ्या मुळा व भंडारदरा धरणाने तळ गाठला होता़ मात्र पाणलोटक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे़ दोन्ही धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली आहे़ असे असले तरी जिल्ह्यात अत्याल्पच पाऊस पडला आहे़ अकोले तालुक्यात मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक ९१ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ इतरत्र अत्याल्प पाऊस पडला असून, सर्वात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांत शेवगाव व पाथर्डीचा समावेश आहे़ दक्षिण नगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही़ त्यामुळे दक्षिणेतील टंचाईची स्थिती कायम आहे़ कुकडी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे़ त्यामुळे श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जत शहरासह तालुक्याला दिलासा मिळाला़ दारणा धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे़ नाशिक व पुणे जिल्ह्यातून पाणी आणण्यात आले आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ ही स्थिती कायम असून, नगर जिल्ह्यात फारसा पाऊस पडला नाही़ जिल्ह्यात अवघ्या ११ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला़ येत्या १५ आॅगस्टपर्यंत मुळा धरण भरते, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे़ अपेक्षेप्रमाणे उशिरा का होईना पण पावसाचे जोरदार आगमन झाले आहे़ परंतु जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
टँकरच्या संख्येत घट
पाऊस झाल्याने अकोले तालुक्यातील टँकरची संख्या कमी झाली आहे़ तर श्रीरामपूर शहरासाठी भंडारदरा धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे तेथील टँकर बंद करण्यात आले आहेत़ पाथर्डी तालुक्यातीलही टँकरची संख्या पावसामुळे कमी झाली आहे़त्यामुळे टँकरची संख्या ३६९ वरून ३५५ वर खाली आली आहे़ ही संख्या आणखी कमी होईल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनास आहे़