गोंधळात पार पडली अगस्तीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:53+5:302021-04-02T04:20:53+5:30
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत सभा गुंडाळली, असा आरोप विरोधकांनी केला. तर सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली, असा दावा ...

गोंधळात पार पडली अगस्तीची सभा
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत सभा गुंडाळली, असा आरोप विरोधकांनी केला. तर सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली, असा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सभा झाली.
पिचड म्हणाले, कारखान्याचे भविष्य उज्ज्वल आहे. सभासदांनी कसल्याही भूलथापांना बळी पडू नये. तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढल्या तर पळता भुई थोडी होईल, अशी टीका विरोधकांचे नाव न घेता चेअरमन पिचड यांनी केली.
कारखाना कार्यस्थळी उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळी, मीनानाथ पांडे, वैभव पिचड, कचरू शेटे, रामनाथ वाकचाैरे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, राजेंद्र डावरे, अशोक आरोटे, अशोक देशमुख, सुनील दातीर, भीमसेन ताजणे, भाऊसाहेब देशमुख, सुरेखा देशमुख, मनीषा येवले, कार्यकारी संचालक भास्कर घुले, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके उपस्थित होते.
आमदार डाॅ. किरण लहामटे, शेतकरी नेते दशरथ सावंत, डाॅ. अजित नवले, बी.जे. देशमुख, विनय सावंत, भानुदास तिकांडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे बसून सभेत सहभाग नोंदविला.
कारखान्यातून १० हजार साखरपोती चोरीला गेली. त्याकारणे तत्कालीन लेखापाल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. इथेनॉल प्रकल्प निर्मितीत भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा कारखाना प्रशासनाने दिला.
दहा हजार साखरपोती चोरीला गेल्याची कबुली देऊन कारखान्यात आलबेल नाही, हे सत्ताधारी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दिवंगत व्यक्तीवर आरोप करणे योग्य नाही. एकटा लेखापाल चोरून साखर विकू शकत नाही. या प्रकरणात सहभागी असणारांचा छडा लावला पाहिजे. सभासदांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया अजित नवले यांनी लोकमतशी बोलताना दिली.
.................
इथेनॅाल प्रकल्पात भ्रष्टाचार केलेला आढळल्यास भर चाैकात फाशी द्या. मात्र, कारखान्याची पत बाजारात बदनाम करू नका. तत्कालीन लेखनाला यांनी १० हजार पोत्यांची प्रशासनाला आम्हाला माहिती न होता विक्री केली. त्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते. त्यांचे पुस्तक काय काढता? आणि कसले प्रश्न विचारता? कारखान्याच्या हिताचे प्रश्न असतील, त्याची लेखी उत्तरे देऊ.
- सीताराम गायकर, उपाध्यक्ष
..............
सत्ताधा-यांनी आजही श्वेतपत्रिका काढून सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाहीर करावी. येणाऱ्या अधिवेशनात १० हजार पोत्यांच्या विक्रीबाबत प्रश्न जनतेच्या बाजूने मांडणार आहे.- - डाॅ. किरण लहामटे, आमदार