खासगी रुग्णालयाचे ऑडिटिंग नावालच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:26+5:302021-06-09T04:25:26+5:30
अहमदनगर : कोरोना रुग्णांवरील उपचार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने निश्चित केलेली जास्तीच्या बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळालीच नाही. खासगी रुग्णालये ...

खासगी रुग्णालयाचे ऑडिटिंग नावालच
अहमदनगर : कोरोना रुग्णांवरील उपचार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने निश्चित केलेली जास्तीच्या बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळालीच नाही. खासगी रुग्णालये आणि समिती यांच्या घोळामध्ये रुग्णांची जास्तीची रक्कम निश्चित होऊनही ती परत मिळाली नाही. दुसऱ्या लाटेत प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी एक ऑडिटर नियुक्त केला. त्यांनी रुग्णांना घरी सोडण्यापूर्वीच रुग्णांच्या बिलातील तब्बल ९ लाखांच्यावर रक्कम कमी केल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
पहिल्या लाटेत अनेक रुग्णांना जास्तीची बिले आकारण्यात आली. याबाबत शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नियुक्त केली. जिल्हा प्रशासनातील लेखापालांना खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगर शहरातील १७ खासगी रुग्णालयांनी तब्बल १२०० रुग्णांच्या बिलात १ कोटी २० लाख रुपये जास्तीची आकारणी केल्याचे तपासणी स्पष्ट झाले होते. सदरची रक्कम खासगी रुग्णालयांकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले. मात्र महापालिका प्रशासन आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर यांच्यातील घोळात सदरची रक्कम महापालिकेने वसूल केली नाही. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आल्याने खासगी रुग्णालयांवरील कारवाई थांबली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलमागे एक ऑ़डिटर नियुक्त केला. रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच बिलांची तपासणी करावी आणि त्यानुसार जास्तीचे बिले आले तर त्यांच्या बिलातून लगेच सदरची रक्कम कपात करूनच रुग्णांना बिल देण्याचा आदेश दिला. त्याची कार्यवाही सुरू झाली असून आतापर्यंत ५ हजार २४९ बिलांमधील ९ लाख ३६ हजार ७०० रुपये कमी करण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने सांगितले.
---------------
अशी आहे आकडेवारी
कोरोनावर उपचार करणारे शहरातील हॉस्पिटल- ६६
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले ऑडिटर्स- ४८
जास्त बिले घेतल्याच्या तक्रारी- ५२४९
--------------
एका रुग्णालयाला नोटीस
खासगी रुग्णालयापैकी नगर शहरातील औैरंगाबाद रोडवरील सुरभी या एका खासगी हॉस्पिटलला प्रशासनाने नोटीस बजावली आहे. रुग्णांची बिले तपासणीत कोणतेही सहकार्य केले जात नाही, याबाबत सदरची नोटीस देण्यात आली आहे.
-------------
सध्या प्रत्येक खासगी रुग्णालयामागे एक ऑडिटर नियुक्त केला आहे. रुग्णांना बिले देताना आणि रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच बिलांचे ऑडिट केले जाते. जास्तीची रक्कम असल्यास ती बिलांमधून लगेच कपात केली जाते. पहिल्या लाटेत १२०० बिलांची १ कोटी २० लाख रक्कम जास्तीची आकारण्यात आली होती. याबाबत महापालिकेला कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने सदरची कारवाई थांबवावी लागली.
-पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी, तथा समितीच्या प्रमुख
----------
एकाही रुग्णाला पैसे परत नाही मिळाले
कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी जास्तीची बिले आकारली. याबाबत तक्रारी आलेल्या खासगी रुग्णालयांची चौकशी झाली. काही रुग्ण बरे होऊन घरी गेले तर काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी पाठपुरावा केला. तपासणीत जास्तीची बिले आकारल्याचे स्पष्ट ही झाले. मात्र एकाही रुग्णाला अथवा रुग्णाच्या नातेवाईकाला एक रुपयाही परत केला नाही. त्यामुळे बिलांचे हे अजूनही भिजत घोंगडे आहे.
-----------
डमी आहे.