भाजपाचा शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 21, 2016 23:47 IST2016-02-21T23:35:57+5:302016-02-21T23:47:01+5:30

अहमदनगर : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांचे शोषण करुन शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे.

Attempts to break BJP's education system | भाजपाचा शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न

भाजपाचा शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न

अहमदनगर : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांचे शोषण करुन शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. विद्यार्थ्यांवरही देशद्रोहाचे खटले भरले जात आहेत. यामुळे शिक्षक व तरुणांनी संघटीत राहून मुकाबला करणे आवश्यक आहे. घटनेने शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मोठा अधिकार दिला असून त्याचा वापर करण्यास शिका, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी केले.
प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचा जिल्हा मेळावा रविवारी येथे झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, प्रकाश दाणे, भरत शेलार, नवनाथ गेंड, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, वसंत कर्डिले, सुनील मते, काळू धनगर, सुनील गाडगे, अप्पासाहेब जगताप, बाबासाहेब लोंढे, आशा मगर, विभावरी रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, वस्तीशाळा शिक्षकांनी एकत्रित नियोजनपूर्वक लढा दिल्याने त्यांना यश आले. वाड्या- वस्त्यांवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे. शिक्षणमंत्री शाळाबाह्य विद्यार्थ्यांबाबत बोलतात. मात्र, वस्तीशाळा शिक्षकांनी आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले असताना सरकारकडून या शिक्षकांचे शोषण सुरू आहे. या शिक्षकांचा मूळ सेवेचा विषय असून त्यासाठी कायदेशीर पातळीवर सल्ला घेवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
२००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या पेन्शनचा विषय आहे. हा प्रकार केवळ शिक्षकांच्या बाबतीत नसून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांबाबत आहे. हा प्रश्न सोडवणे कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सरकारकडून कायदे संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फसवून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने शिक्षकांचे शोषण करू नये. ज्या देशात शिक्षकांचे शोषण होते, तो देश पुढे जावू शकत नाही, अशी टीका पाटील यांनी केली.
कोणत्याही क्षेत्रात शिक्षकांशिवाय प्रगती नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळाव्यात सुरुवातीला गुंड यांनी मार्गदर्शन केले. अनुदानित शिक्षण बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे यावेळी बेलसरे म्हणाले. लवकरच शिक्षक भारतीची एकदिवसीय शिक्षण परिषद घेण्याचा प्रयत्न असल्याचे गेंड यांनी सांगितले. यावेळी खोसे, दाणे यांची भाषणे झाली.
(प्रतिनिधी)
मेळाव्यात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा विषय दिनेश खोसे यांनी काढला. यंदाच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होवू नये. पुढील वर्षी शिक्षक भारती स्वतंत्र पॅनल करणार असून आ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँक ताब्यात घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

Web Title: Attempts to break BJP's education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.