साईनगरीतील विद्यार्थ्याकडून माणुसकी जागवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:07+5:302021-03-16T04:21:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : साईनगरीतील एका पंधरावर्षीय विद्यार्थ्याने समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी माणुसकी जागवणारी चळवळ ...

Attempt to awaken humanity from a student in Sainagari | साईनगरीतील विद्यार्थ्याकडून माणुसकी जागवण्याचा प्रयत्न

साईनगरीतील विद्यार्थ्याकडून माणुसकी जागवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

शिर्डी : साईनगरीतील एका पंधरावर्षीय विद्यार्थ्याने समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी माणुसकी जागवणारी चळवळ सुरू केली आहे. ही चळवळ भविष्यात जगभर पसरेल, असा या विद्यार्थ्याला विश्वास आहे. मागील कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

साईश विनोद गोंदकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘निड फॉर निडी’ हे स्लोगन घेऊन साईशने लॉकडाऊनमध्ये श्रीगणेशा केलेल्या या कार्याची हकिकतही रंजक आहे. सुखवस्तू जीवन जगणाऱ्या साईशला या काळातील समाजाच्या वेदनांनी घायाळ केले. कपडे तंग होऊ लागल्याने वडिलांनी जेव्हा त्याला नवीन कपडे घेण्याचा आग्रह धरला, तेव्हा नवीन कपडे घेण्यापूर्वी त्याने आपले जुने कपडे, पुस्तके व शालेय साहित्य वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना वाटून टाकले.

या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधानाने साईशला जगण्याचा नवीन मार्ग दाखवला. दुसऱ्या दिवशी त्याने घरातील शिल्लक व कालबाह्य न झालेली औषधे घेऊन प्राध्यापक असलेल्या वडिलांसह अस्तगावचे ग्रामीण रूग्णालय गाठले. तेथील डॉ. रवींद्र गोर्डे यांच्याकडे औषधे सुपुर्द करून ती गरीब रुग्णांना विनामूल्य देण्यासाठी विनंती केली.

आगळ्यावेगळ्या समाजसेवेने झपाटलेल्या साईशने यानंतर सायकलवर शिर्डीतील अनेक घरी जाऊन त्यांच्याकडील जुने कपडे व शिल्लक औषधे गोळा करून गरजूंमध्ये वाटली. सुरुवातीला चेष्टेने बघणारे अनेक जण आता आपल्याकडील जुने कपडे व औषधे साईशच्या घरी पोहोचवत आहेत. रेन्बो इंटरनॅशनल या साईशच्या शाळेचे संचालक आकाश नागरे व प्राचार्य शैला झुंजारराव यांनीही कौतुक केले. यावरच ते थांबले नाही तर त्यास शालेय वस्तू, कपडे व औषधे देऊ केले. यामुळे त्याचा उत्साह वाढला. काही दिवसांपूर्वी पालघरजवळील सफाळा, केळवा बीचवर सहलीसाठी गेलेल्या साईशने तेथील जयेश राऊत यांची मुले साईश व विदित यांची भेट घेऊन आपल्या विचारांची बीजे रोवली. शिर्डीतील त्याचे अनेक मित्रही आता या चळवळीत सहभागी झाले आहेत.

.....

प्रत्येक विद्यार्थ्याने आठवठ्यात किमान दोन तास समाजासाठी द्यावेत, दर रविवारी एखाद्या वृद्धाला, अपंगाला, रुग्णाला किंवा शेतकऱ्याला मदत करावी. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला यातून समाजाच्या वेदना कळतील. वास्तवाचे भान येईल.

-साईश गोंदकर, शिर्डी

Web Title: Attempt to awaken humanity from a student in Sainagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.