सांस्कृतिक लढाईच्या आडून सुविधांवर आक्रमण
By Admin | Updated: May 27, 2016 23:25 IST2016-05-27T22:56:22+5:302016-05-27T23:25:44+5:30
अहमदनगर : सांस्कृतिक लढाईच्या आडून आज शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक आहे,

सांस्कृतिक लढाईच्या आडून सुविधांवर आक्रमण
अहमदनगर : सांस्कृतिक लढाईच्या आडून आज शोषितांच्या भौतिक सुविधाही हिरावून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष समजावून घेत शोषितांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी शुक्रवारी येथे केले. ज्येष्ठ लेखक व विचारवंत दत्ता देसाई यांना कॉ.गोविंद पानसरे प्रबोधिनी पुरस्कार डॉ.साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, अरुण कडू यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. साळुंखे म्हणाले की, या पुरस्कारामुळे कॉ.पानसरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम घडत आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार निमित्त आहे त्यांचा विचार चिरंतन राहावा व तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा हा खरा उद्देश आहे. पानसरे राज्यकर्त्यांविरुद्ध लढत होते तरी दुबळ्यांसाठी त्यांचे काळीज तडफडत होते. पानसरेंसारखे लोक नेहमी लढत असतात. चाकोरीबद्ध विचारांच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार पानसरे यांनी समाजासमोर मांडला असे सांगून ते म्हणाले की, धार्मिक तणाव-जातीय तेढ संघर्षाने सुटणार नाही त्यासाठी संवादाचा मार्ग उत्तम आहे. शोषितांच्या चळवळी प्राचीन काळापासून सुरु आहेत़ चळवळीच्या ध्येयपूर्तीसाठी मात्र, आजही कॉ़ पानसरेंसारख्या समाजसेवकांना प्राण गमवावा लागत आहे़ ज्यांना प्रस्थापित समाज व्यवस्था टिकवायची ते त्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात़ परंतु,जे शोषितांच्या चळवळी चालवत आहेत तेही चळवळी पुढच्या पिढीपर्यंत नेण्यास कमी पडले ही मोठी उणीव सांस्कृतिक संघर्षात राहून गेली,अशी खंत त्यांनी व्यक्त केली़ यावेळी दत्ता देसाई म्हणाले की,जे लोक राष्ट्रवादाचा आशय नव्याने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. आता केवळ बचावात्मक पवित्रा घेऊन चालणार नाही तर नवा राष्ट्रवाद , नवी धर्मनिरपेक्षता पुढे न्यायची आहे ती जबाबदारी या पुरस्कारामुळे मला मिळाली आहे. यावेळी अरुण कडू यांचे भाषण झाले. प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांनी प्रास्ताविक केले. कॉ. बन्सी सातपुते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)