पाणीचोरी रोखणाऱ्या पंचायत समिती सभापतींवर हल्ला
By Admin | Updated: May 4, 2016 23:59 IST2016-05-04T23:44:01+5:302016-05-04T23:59:40+5:30
अहमदनगर/ सोनई : मिरी-तिसगाव सरकारी पाणी योजनेतून पाणी चोरण्यास विरोध करणाऱ्या पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे (भाजपा) व त्यांचे बंधू भरत पालवे यांच्यावर मंगळवारी

पाणीचोरी रोखणाऱ्या पंचायत समिती सभापतींवर हल्ला
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल : संभाजी पालवे जखमी; तलवारीने केले वार
अहमदनगर/ सोनई : मिरी-तिसगाव सरकारी पाणी योजनेतून पाणी चोरण्यास विरोध करणाऱ्या पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे (भाजपा) व त्यांचे बंधू भरत पालवे यांच्यावर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जमावाने हल्ला केला. त्यामध्ये पालवे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिराळ चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर-औरंगाबाद रोडवरील पांढरीपुलाजवळ असलेल्या वांजोळी शिवारातील मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवरून मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पाच खासगी टँकर पाणी भरण्यासाठी आले होते. याबाबतची माहिती तेथील कर्मचारी संजय दातीर यांनी सभापती पालवे यांना कळविली. पालवे हे त्यांचे बंधू भरत पालवे यांच्यासह पाणी योजनेवर पोहोचले. सरकारी योजनेतून खासगी लोकांना पाणी भरण्यास पालवे यांनी विरोध केला. यावेळी टँकरच्या पाचही चालकांनी पालवे यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच तलवारीने मारहाण केली. यामध्ये संभाजी पालवे जखमी झाले असून त्यांच्या एका डोळ््याला गंभीर इजा झाली आहे. त्यांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात दिवसभर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
दरम्यान, संभाजी पालवे यांनी बुधवारी दुपारी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून गणेश रामदास गोरे, अरुण लक्ष्मण गोरे, बापू लक्ष्मण गोरे, बाळासाहेब लक्ष्मण गोरे, रामदास श्रीपती गोरे, रामदास श्रीपती गोरे, विनोद गोरे (सर्व रा. शिराळ चिचोंडी, ता. पाथर्डी) या सात जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरीपूल येथे तिसगाव-मिरी सरकारी पाणी योजना आहे. येथून सरकारी टॅँकर्सना पाणी भरण्याची परवानगी आहे. मात्र, या ठिकाणाहून काही खासगी टँकरचालक पाणी भरत असल्याची माहिती मिळाल्याने घटनास्थळी गेल्याचे पालवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे सोनई पोलिसांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरले जात असल्याची माहिती मला तेथील कर्मचाऱ्याने सांगितली़ म्हणून तेथे जाऊन शासकीय योजनेचे पाणी खासगी कामासाठी नेऊ नका, असे मी सौम्य भाषेत सांगितले़ तरीही त्यांनी मला शिवीगाळ करुन काठी, तलवारीने मारहाण केली़
-संभाजी पालवे, सभापती,
पाथर्डी पंचायत समिती