तहसीलदारांवर हल्ला : माजी सरपंचासह दोघांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 16:49 IST2019-02-26T16:49:21+5:302019-02-26T16:49:32+5:30
वाळूचे वाहन तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निमगाव डाकू येथील माजी सरपंचासह दोघांना दोषी धरून जिल्हा न्यायालयाने दहा दिवस कैद व दंडाची शिक्षा सुनावली.

तहसीलदारांवर हल्ला : माजी सरपंचासह दोघांना शिक्षा
अहमदनगर : वाळूचे वाहन तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निमगाव डाकू येथील माजी सरपंचासह दोघांना दोषी धरून जिल्हा न्यायालयाने दहा दिवस कैद व दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारी वकील म्हणून अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. जामखेडचे तत्कालीन तहसीलदार विजय कुलांगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. २७ जून २०११ रोजी तहसीलदारांसह महसूल पथकाने चौंडी गावालगत असलेल्या सीना नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी छापा टाकला. त्यावेळी तेथे अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. पथकाने हा ट्रॅक्टर पकडला, परंतु काही वेळातच तेथे आरोपी माजी सरपंच श्रीकांत उर्फ राजू चंद्रकांत भोसले (वय ४४, निमगाव डाकू, ता. कर्जत) हा २० ते २५ लोकांना घेऊन आला. त्याने आरोपी ट्रॅक्टरचालक हनुमंत शंकर कुतवळे (रा. निमगाव डाकू) याला महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे कुतवळे याने पथकावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तहसीलदारांसह त्यांचे पथक बाजूला झाल्याने या हल्ल्यातून बचावले. त्यानंतर आरोपी वाळूचा ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा खटला येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर चालला. यात एकूण आठ साक्षीदार तपासले.