"१९९२ मध्ये माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. त्या दिवसापासून अखेरपर्यंत आमचा सातत्याने संपर्क राहिला. प्रत्येक विषयावर चर्चा करणं, मत मांडणं, मार्गदर्शन करणं असं नेतृत्व अजित दादांचं होतं. सहकारातील बारकावे, साखर कारखाने, खासगी व सहकारी संस्था, जिल्हा बँका, त्यांचे पदाधिकारी, संचालक, त्यांची स्थिती या सगळ्याची इतंभूत माहिती अजितदादांकडे होती", असे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवार यांच्या निधनानंतर अहिल्यानगर येथे सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना बाळासाहेब थोरात भावूक झाले.
चुकीकडे दुर्लक्ष न करणे त्यांचे वैशिष्ट्य
"राज्यातील प्रत्येक जिल्हा बँक, प्रत्येक बाजार समिती, त्यामधील घडामोडी, अगदी नवी मुंबई बाजार समितीपर्यंत कसं काम चाललं आहे याची बारीक सारीक माहिती ठेवणारा नेता म्हणजे अजित दादा होते. वेळप्रसंगी योग्य ठिकाणी बोट ठेवून थेट बोलणं, चुकीकडे दुर्लक्ष न करणं हे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होतं", असे थोरात म्हणाले.
बाळासाहेब थोरात अजित पवारांबद्दल बोलताना म्हणाले, "इतका सखोल अभ्यास क्वचितच कुणाकडे पाहायला मिळतो. हा अभ्यास अजितदादांचा होता, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही एकत्र काम केलं, एकत्र राहिलो. पक्षीय बदल, राजकीय स्थित्यंतरं झाली असतील; पण सर्वांशी चर्चा करण्याची त्यांची पद्धत कायम होती."
अजित पवार ठामपणे सांगणारे नेते होते
"मंत्रिमंडळात सहकारी म्हणून काम करताना अनेक वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय कुणाला दुखावणारे असतात. मात्र निर्णय सार्वजनिक हिताचा असेल, तर तो कितीही कटू असला तरी तो घेण्याची क्षमता अजितदादांकडे होती. 'कोण रागवेल, कोण नाराज होईल, कोण काही काळासाठी दुरावेल याची चिंता करू नका' असं ठामपणे सांगणारा नेता म्हणजे अजितदादा होते", असे बाळासाहेब थोरात अजित पवारांच्या नेतृत्व गुणाबद्दल म्हणाले.
"त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी समृद्ध होतं. कर्तृत्ववान, अभ्यासू, निर्णयक्षम आणि अत्यंत स्पष्टवक्ता. सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू व्हायचा. दिवसभर काम, येणाऱ्या प्रत्येक विषयाचा सखोल विचार, योग्य तो सोक्षमोक्ष लावणं. नाही म्हणायचं असेल तर स्पष्टपणे नाही म्हणणं ही प्रामाणिक स्पष्टता त्यांची महाराष्ट्रातच नाही तर देशातही आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारी ठरली", असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
"वर्षानुवर्षांच्या प्रक्रियेतून घडलेलं, तयार झालेलं असं हे नेतृत्व आज अचानक आपल्यातून निघून जाणं म्हणजे केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा तोटा नाही. हा तोटा राज्याचा आहे, देशाचा आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अजून त्यांच्यापुढे मोठा कालखंड होता. अजून खूप काम करण्याची क्षमता, ऊर्जा आणि दृष्टी त्यांच्यामध्ये होती. अशा वेळी त्यांचं आपल्यातून निघून जाणं ही अत्यंत दुःखद आणि वेदनादायक घटना आहे", अशी हळहळ बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली.
Web Summary : Balasaheb Thorat reminisced about Ajit Pawar's dedication, knowledge, and ability to make tough decisions for the public good. He highlighted Pawar's deep understanding of cooperative institutions and his commitment to clear communication, noting his work ethic began early each day. Thorat expressed sorrow at the loss of such a capable leader.
Web Summary : बालासाहेब थोरात ने अजित पवार के समर्पण, ज्ञान और सार्वजनिक हित के लिए कठिन निर्णय लेने की क्षमता को याद किया। उन्होंने सहकारी संस्थानों की पवार की गहरी समझ और स्पष्ट संचार के प्रति उनकी प्रतिबद्धता पर प्रकाश डाला, यह देखते हुए कि उनकी कार्य नीति हर दिन जल्दी शुरू होती थी। थोरात ने इतने सक्षम नेता के खोने पर दुख व्यक्त किया।