पाॅलिटेक्निक, फार्मसी विद्यार्थ्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:16+5:302021-02-21T04:39:16+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या स्थितीमुळे यंदा सर्वच महाविद्यालयांचे प्रवेश लांबले. त्यात पाॅलिटेक्निक व फार्मसी महाविद्यालयांचे प्रवेश मागील महिन्यातच उरकले असतानाच ...

पाॅलिटेक्निक, फार्मसी विद्यार्थ्यांची दमछाक
अहमदनगर : कोरोनाच्या स्थितीमुळे यंदा सर्वच महाविद्यालयांचे प्रवेश लांबले. त्यात पाॅलिटेक्निक व फार्मसी महाविद्यालयांचे प्रवेश मागील महिन्यातच उरकले असतानाच लगेच एप्रिल, मे मध्ये या विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा जाहीर झाली. त्यामुळे अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची दमछाक होत असून, प्राध्यापकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
यंदा कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीर झाले. परिणामी सर्वच शैक्षणिक सत्र कोलमडले. साधारण जून, जुलैमध्ये होणारी प्रवेश प्रक्रिया कमालीची लांबली. पाॅलिटेक्निक (तंत्रनिकेतन) व फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश तर जानेवारीपर्यंत सुरू होते. पाॅलिटेक्निकची अंतिम प्रवेशप्रक्रिया ५ जानेवारी, तर फार्मसीची प्रवेशप्रक्रिया १५ जानेवारीला संपली. मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. शिवाय पाॅलिटेक्निक महाविद्यालये अजून सुरू झालेली नाहीत. तर फार्मसी काॅलेज नुकतेच सुरू झाले आहेत. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करताना प्राध्यापकांची व शिक्षकांचीही दमछाक होणार आहे.
नगर जिल्ह्यात १ शासकीय, तर ३२ खासगी तंत्रनिकेतन महाविद्यालये असून त्यात पहिल्या वर्षाला साधारण साडेआठ ते ९ हजार विद्यार्थी आहेत. तसेच फार्मसीचे जिल्ह्यात २७ महाविद्यालये असून त्यात प्रथम वर्षाचे साधारण चार हजार विद्यार्थी आहेत.
--------------
काय म्हणतात प्राचार्य
यंदा कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया थोडी लांबली. महाविद्यालयांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही,याची काळजी शासनाने घेतली आहे.
- मुकुंद सातारकर, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन
-------------
कोरोनामुळे यंदा परीक्षेसाठी कमी कालावधी असल्याने जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. परीक्षा ॲानलाईन होणार असल्याने त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.
- आर. डी. उगले, प्राचार्य यशवंतराव चव्हाण, फार्मसी काॅलेज
-----------------
काय म्हणतात विद्यार्थी
प्रवेश लांबल्याने अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासासाठी फार कमी वेळ आहे. त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे.
- वनिरा भागवत, विद्यार्थी फार्मसी काॅलेज
--------
यंदा एमसीक्यू पद्धतीने ॲानलाईन परीक्षा होणार असल्या तरी तयारीला खूप कमी वेळ आहे. शिवाय काॅलेज बंद असल्याने प्रात्यक्षिक किंवा इतर बाबी करण्यास मर्यादा येत आहेत.
- शरद शिंदे, विद्यार्थी फार्मसी काॅलेज
-----------
जिल्ह्/ातील काॅलेजची स्थिती
एकूण पाॅलिटेक्निक काॅलेज - ३३
विद्यार्थी - सरासरी ९ हजार
एकूण फार्मसी काॅलेज - २७
प्रथम वर्ष विद्यार्थी - सरासरी ४ हजार