मनसेची विधानसभेसाठी चाचपणी

By Admin | Updated: July 12, 2014 01:10 IST2014-07-11T23:25:15+5:302014-07-12T01:10:44+5:30

अहमदनगर: मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे़ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी वरिष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी नगरमध्ये येत

Assessment of the MNS Legislative Assembly | मनसेची विधानसभेसाठी चाचपणी

मनसेची विधानसभेसाठी चाचपणी

अहमदनगर: मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे़ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी वरिष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी नगरमध्ये येत असून, दक्षिण व उत्तर नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र मुलाखती होणार आहेत़
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपा सत्तेवर आले़ मोदी यांच्यापासून धडा घेऊन राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत लाट निर्माण करून विधानसभेवर मनेसेचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे़ मनसे प्रमुख स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत़ त्यामुळे मनसे सैनिकांची फौज कामाला लागली आहे़ मतदारसंघातील बैठकांना जोर आला आहे़ या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील मतदारसंघात सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात असून, इच्छुकांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे एक शिष्टमंडळ सोमवारी नगर दौऱ्यावर येत आहे़ शिष्टमंडळात मनसेचे नितीन सरदेसाई, जयकुमार बावीस्कर, दीपक पायगुडे आणि शिवाजीराव नलावडे यांचा समावेश आहे़
दक्षिण नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या शासकीय विश्रामगृहात तर, उत्तर नगर जिल्ह्यातील इच्छुकांशी शिर्डीत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले़
महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले़ संपर्कप्रमुख शहरात तळ ठोकून होते़ तरीदेखील मनसेच्या हाती फार काही लागले नाही़ महापालिकेत झालेली चूक विधानसभेत होणार नाही, असे वचन देत शहर मनसेच्या दोघा नेत्यांनी उमेदवारीसाठी हात पुढे केला आहे़ विद्यमान स्थायी समिती सभापती किशोर डागवाले इच्छुक आहेत़ त्यांनी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे़ ज्येष्ठ नेते वसंत लोढाही बाशिंग बांधून आहेत़ मात्र सावेडी आणि तोफखान्यातील युवा नेते उमेदवारीसाठी मनसेच्या वाटेवर आहेत़ त्यांनीही मनसेकडे शब्द टाकला आहे़
परंतु चोरी चुपके येणाऱ्यांना उमेदवारी नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे़ त्यामुळे त्यांची अडचण होणार आहे़ शहरात पक्षातील की बाहेरचा, याबाबत मंथन सुरू आहे़ आघाडीत बिघाडी झाल्यास जिल्ह्यातील काही दिग्गजही मनसेत उडी मारण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे उमेदवारीकरीता मोठी रस्सीखेच होणार असून, पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर खड्यासारखे बाजूला केले जाण्याची शक्यता आहे़
(प्रतिनिधी)
मनसेच्या पायघड्या
पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे शहरात पक्ष वाढला नाही़ त्यामुळे पक्षाची शहरात पीछेहाट झाली असून, उमेदवार आयात करण्याची वेळ मनसेवर आली आहे़ उमेदवारीसाठी प्रामाणिकपणाचा निकष लावणाऱ्या मनसेने यावेळी भूमिका बदलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़
उमेदवारीसाठी मनसेत रस्सीखेच
नगर शहरातून मनसेचे स्थायी समिती सभापती किशोर डागवाले, वसंत लोढा, धनंजय जाधव, स्वप्निल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहेत़ जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातून मोहन रांदवणे यांच्यासह सेनेचे दिग्गज नेतेही मनसेकडून इच्छुक आहेत़ कर्जत- जामखेडमधून सचिन पोटरे, पाथर्डीतून देवीदास खेडकर, कोपरगावमधून चांदगुडे, शिर्डीतून विजय काळे, दत्तू कोते, शेखर बोराडे, राहुरीतून शिवाजी गाडे, नेवासा मतदारसंघातून दिलीप मोटे यांच्या नावाची चर्चा आहे़ मात्र यापैकी मुलाखतीला कोण उपस्थित राहतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
विश्रामगृहावर इच्छुकांशी चर्चा
नगर दक्षिण मतदारसंघातील इच्छुकांच्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ ते ११ यावेळी मुलाखती घेण्यात येणार आहेत़ उत्तरेतील मतदारसंघातील इच्छुकांच्या शिर्डी येथे दुपारी २ वाजता मुलाखतींना सुरुवात होणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली़
शहरासह जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे़ इच्छुकांच्या मुलाखती येत्या सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे होणार आहेत़ मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाकडून या मुलाखती घेतल्या जातील़ मनसेकडून इतर पक्षातीलही काहीजण इच्छुक असून, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे़अनेक दिग्गजांनी मनसेकडे तिकिटाची मागणी केली़ त्यापैकी चर्चेसाठी कोण उपस्थित राहतात, ते महत्वाचे आहे़
- सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष, मनसे

Web Title: Assessment of the MNS Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.