बुगेवाडी-सोबलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण दोनच दिवसांत उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:19 IST2021-04-12T04:19:36+5:302021-04-12T04:19:36+5:30
पारनेर : नगरपंचायतीच्या ठेकेदाराने केलेल्या बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोनच दिवसांत उखडले. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त ...

बुगेवाडी-सोबलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण दोनच दिवसांत उखडले
पारनेर : नगरपंचायतीच्या ठेकेदाराने केलेल्या बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोनच दिवसांत उखडले. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
नगरपंचायतीच्या वतीने बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्यासाठी ३६ लाख रुपयांचा निधी डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे. काम अंतिम टप्प्यात असून ठेकेदाराने दोन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण केले. डांबरीकरण पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही, तोच रस्ता उखडून त्यातून माती दिसू लागल्यावर बुगेवाडी ग्रामस्थांनी तातडीने नगरपंचायतीमध्ये जाऊन मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्याकडे रस्ता कामाविषयी तक्रार केली. कुमावत यांनी स्वतः रस्त्याच्या कामावर जाऊन ठेकेदारास डांबरीकरण व्यवस्थित करून देण्याचे आदेश दिले.
--
बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्ता निकृष्ट झाला असून थेट रस्त्यावरील पहिला मातीचा थर उखडला आहे. यामुळे या रस्त्याचे चांगले डांबरीकरण व्हावे तसेच बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी केल्यानंतरच बिल अदा करावे.
-गोटू कावरे,
बुगेवाडी, पारनेर
-बुगेवाडी-सोबलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण काम अद्याप अपूर्ण असून नियमाप्रमाणे काम दर्जेदार करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत.
डॉ. सुनीता कुमावत,
मुख्याधिकारी, नगरपंचायत, पारनेर
--
११ पारनेर रस्ता
पारनेर शहरालगतच्या बुगेवाडी-सोबलेवाडी रस्त्याचे उखडलेले डांबरीकरण.