नगर-सोलापूर मार्गावरून यंदाही आषाढी वारीचा गजर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:04+5:302021-07-11T04:16:04+5:30

रूईछत्तीसी : कोरोनाच्या लाटेमुळे यंदाही आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे यंदाही नगर-सोलापूर महामार्गावरून विविध ...

Ashadhi Wari alarm disappears from Nagar-Solapur road again this year | नगर-सोलापूर मार्गावरून यंदाही आषाढी वारीचा गजर गायब

नगर-सोलापूर मार्गावरून यंदाही आषाढी वारीचा गजर गायब

रूईछत्तीसी : कोरोनाच्या लाटेमुळे यंदाही आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे यंदाही नगर-सोलापूर महामार्गावरून विविध दिंड्यांच्या माध्यमातून होणारा आषाढी वारीचा गजर गायब झाला आहे.

दरवर्षी शेकडो दिंड्या या मार्गावरून पायी चालत पंढरीला जातात. नगरपासून २४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रूईछत्तीसी (ता. नगर) येथे यातील बऱ्याचशा दिंड्या मुक्कामी असतात. काही दिंड्यांना रूईछत्तीसी व आसपासच्या गावावरून अन्नदान दिले जाते. परंतु, गेल्या वर्षीपासून कोरोनाचे सावट असल्याने वारकरी पंढरी वारीला मुकले आहेत. परवानगी नसतानाही गावातून दोन ते तीन वारकरी पायी पंढरपूरकडे जात आहेत. देवगड आणि निवृत्तीनाथ पालखी सोहळा याच मार्गावरून पंढरपूरकडे जातो. या दोन्हीही दिंड्या दुपारच्या भोजनासाठी रूईछत्तीसी गावात थांबतात. या दिंडीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी रूईछत्तीसी, गुणवडी, वाटेफळ, साकत, दहिगाव, वडगाव या गावातील लोक गर्दी करतात आणि मोठा सोहळा साजरा होतो. सलग १५ दिवस नगर-सोलापूर महामार्ग वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातो. पंढरीच्या दिशेने जात असलेले वारकरी हरिनामाचा गजर करत देहभान विसरून विठ्ठलाची आळवणी करतात. १७ जुलैपासून पंढरपुरात संचारबंदी लागू आहे. परंतु, कोरोनाने हा सर्व आनंद हिरावून घेतल्याने वारकरी नाराज झाले आहेत.

-----

गेल्या वर्षीपासून आषाढी वारी बंद असल्याने वारकऱ्यांना कधी पंढरीला जाईल, असे झाले आहे. कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले. भविष्यात वारीला कधीही जाता येईल. मात्र कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना आहे.

भास्करगिरी महाराज,

महंत, देवगड देवस्थान, ता. नेवासा

---

पंढरपुरात गर्दी होत असल्याने १७ जुलैपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारकऱ्यांसह सर्वांनीच प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

-विश्वजित जगदाळे,

सहायक पोलीस निरीक्षक, पंढरपूर

Web Title: Ashadhi Wari alarm disappears from Nagar-Solapur road again this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.