नवविवाहितांचा आषाढ महिना सासरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:23+5:302021-07-19T04:15:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : गत रविवारपासून म्हणजे ११ जुलैपासून आषाढ महिना सुरू झाला आहे. नवविवाहितांनी आषाढ महिनाभर किंवा ...

Ashadh month of newlyweds is Sasari | नवविवाहितांचा आषाढ महिना सासरीच

नवविवाहितांचा आषाढ महिना सासरीच

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : गत रविवारपासून म्हणजे ११ जुलैपासून आषाढ महिना सुरू झाला आहे. नवविवाहितांनी आषाढ महिनाभर किंवा आषाढ महिन्याचे पहिले काही दिवस माहेरी जाण्याची प्रथा आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे अनेक नवविवाहितांनी माहेरी जाणेच टाळले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये गर्दी असल्याने अशा वाहनांमधून प्रवास करण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक नवविवाहितांना यंदाचा आषाढ सासरीच व्यतीत करावा लागत आहे.

कोरोना संकटामुळे प्रत्येकावर निर्बंध आले आहे. विशेषत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रत्येकाला घरात राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाले असून, रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधांमध्ये दूरवर असलेल्या नवविवाहिताही अडकल्या आहेत. त्यांना माहेरी येताच आले नाही. त्यामुळे त्या माहेरी येण्यासाठी आसुसल्या आहेत. आता आषाढ महिना सुरू असून, एकदा तरी आषाढ महिन्यात माहेरी जाता येईल का, याबाबत उत्सुकता लागली आहे.

------------

नवविवाहिता म्हणतात...

कोरोना संकटामुळे सर्वत्र दहशत आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवास करून माहेरी जाणे धोक्याचे वाटत आहे. एकदाचे कोरोना संकट गेल्यानंतरच माहेरी जाण्याचा विचार करीत आहे.

-नवविवाहिता, सावेडी, नगर

---

माझे माहेर लांब आहे. सध्या रेल्वेसुद्धा व्यवस्थित सुरू झाल्या नाही. त्यामुळे माहेरी जाण्यास अडचण आहे. प्रत्येकीलाच माहेरी जाण्याची आवड असते; मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. माहेरच्यांना फोनद्वारे बोलणे होते. आता नाही, पण काही दिवसांना माहेरी जाण्याचा प्लॅन केला आहे.

-नवविवाहिता, पाइपलाइन रोड, नगर

----

नवविवाहिता मुलींच्या आई म्हणतात...

प्रत्येक आईला मुलीला भेटण्याची ओढ राहते. मुलगी सासरी गेली की ती कशी राहणार, याबाबत चिंताही असते. लहानपणापासून सांभाळ केल्यानंतर ती सासरी गेल्यानंतर माहेरी कधी येते, याची प्रत्येक आई वाट बघतात. आता कोरोना संकटामुळे माहेरी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

-नवविवाहितेची आई, शेवगाव

---

मुलगी सासरी गेल्यानंतर मुलीला भेटण्याची तळमळ प्रत्येक आईलाच असते. आषाढ महिन्यात नवविवाहिता माहेरी येतात; मात्र आता ही पद्धत काहीशी कमी झाली आहे. मोबाइल आणि प्रवासी साधने वाढली आहेत, त्यामुळे पूर्वीसारखी आतुरता नाही; मात्र प्रत्येक आईला मुलीला भेटावे असेच वाटते. कोरोना संकटामुळे अनेक अडचणी येत आहे.

-नवविवाहितेची आई, कोपरगाव

---------

विवाहाची नोंद (नगर शहर)

२०२०-२००

२०२१- ३२५

Web Title: Ashadh month of newlyweds is Sasari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.