आषाढ, चातुर्मासातही शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:14+5:302021-07-19T04:15:14+5:30
जुलै महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा पंचांगातील आषाढ महिना सुरू होतो. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. ...

आषाढ, चातुर्मासातही शुभमंगल सावधान
जुलै महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा पंचांगातील आषाढ महिना सुरू होतो. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. जुलै ते नोव्हेंबर हा चातुर्मासाचा काळ असतो. देवशयनी म्हणजे देवांचा विश्रांती काळ असतो. तेव्हा उपासना, व्रतवैकल्ये केली जातात. याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात विवाह होत नाहीत, अशी धारणा आहे. मात्र, कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आषाढ महिना आणि चातुर्मासातही विवाह होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून निर्बंध घालून देण्यात आले.
या काळात विवाह सोहळ्यांवर निर्बंध होते. त्यानंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास कडक निर्बंध लादले जाऊ शकतात. असेही अनेकांना वाटते. त्यामुळे विवाह सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत का होईना आटोपून घेण्यात येत आहेत. आषाढ महिना आणि चातुर्मासातदेखील विवाह सोहळे होत असल्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
-------------
आषाढ, चातुर्मासातील विवाह तारखा
२२, २५,२८, २९ (जुलै), ११, १४, १८,२०,२१, २५, २६, २७, ३०, ३१ (ऑगस्ट)
-------------
घरासमोरच विवाह सोहळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करायचा असल्याने अनेकांनी घरासमोर मंडप घालून विवाह सोहळे उरकून घेतले. तसेच मंगल कार्यालये, लॉन्स येथेही विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र, विवाह कोठेही करत असाल तरीही तो मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
--------------
अनेकांच्या अनेक अडचणी असतात. त्यामुळे गौण काळात (चातुर्मास काळ) आमच्याकडे अनेक यजमान येतात. त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी विवाह मुहूर्त ते मागतात. नाईलाज म्हणून त्यांना पंचागांत आलेले आणि वधु-वरांना लाभणारे मुहूर्त आम्ही देतो. कोरोनाच्या संकटात त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशीच आमची अपेक्षा असते.
-भाऊराव जाखडी, अध्यक्ष, संगमनेर पुरोहित संघ
------------
आता साखरपुडा करून विवाह निश्चित करता येऊ शकतो. तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह करू शकतात. शक्यतो आषाढ महिना आणि चातुर्मासात विवाह करणे टाळावे. ते शास्त्राला धरून नसून ते निषिद्ध मानले जाते.
संदीप वैद्य, उपाध्यक्ष, संगमनेर पुरोहित संघ
-----------
दहा हजार रुपयांचा दंड
गर्दी जमवून विवाह सोहळे होत असलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉन्समध्ये रविवारी आयोजित विवाह सोहळ्यात गर्दी झाल्याने पोलिसांनी दंडात्मक करावाई करत दहा हजार रुपयांचा दंड केला.
-----