ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 12:56 IST2017-08-25T12:55:18+5:302017-08-25T12:56:27+5:30
गणपत्ती बाप्पा... मोरया या जयघोषासह ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पांचे आज आगमन होत आहे. अधून-मधून वरुणराजा उत्साह व्दिगुणित करीत आहे

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन
अहमदनगर : गणपत्ती बाप्पा... मोरया या जयघोषासह ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पांचे आज आगमन होत आहे. अधून-मधून वरुणराजा उत्साह व्दिगुणित करीत आहे. फटाक्यांची आतषबाजी अन गुलालाची उधळण केली जात असून सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनासाठी रस्ते फुलून गेले आहेत. शहरातील बालिकाश्रम रोड व कल्याण रोडवरील गणपती कारखान्यांमध्ये बाप्पा खरेदीसाठी गर्दी झाली असून शहरातील मध्यवर्ती भागात सजावटीच्या साहित्य खरेदीला प्राध्यान्य दिले जात आहे.
शहरात गेल्या दहा-बारा दिवसांपासून बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू होती. आड बाप्पांचे आगमन होणार असल्याने भक्त सकाळपासून तयारीला लागले. बाप्पाच्या आगमनासाठी वाहनांची सजावट करण्यात आली. तसेच ढोल-ताशांचा गजरही घुमला. शहरातील अनेक भागात गणेशमुर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांशी मंडळांनी बालिकाश्रम रोड व कल्याण रोडवरील गणपती कारखान्यातून मूर्ती खरेदीस प्राधान्य दिले. घरगुती मुर्ती खरेदी करणारांनी जवळच्या स्टॉलवरच मुर्ती खरेदी केली. काही मंडळांनी मिरवणुका काढून वाजत-गाजत बाप्पाचे आगमन केले. गणपतीच्या आरती, स्त्रोत आणि मंत्रपठनाने वातावरण मंगलमय बनले आहे. अनेकांनाी मुर्ती खरेदी करतांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.