फरार बोठेला अटक करा..आम्हांला न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:48+5:302021-03-06T04:19:48+5:30
यावेळी माध्यमांशी बोलताना रुणाल जरे म्हणाले, माझी आई रेखा जरे यांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरी या गुन्ह्यातील ...

फरार बोठेला अटक करा..आम्हांला न्याय द्या
यावेळी माध्यमांशी बोलताना रुणाल जरे म्हणाले, माझी आई रेखा जरे यांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळ बोठे हा फरार आहे. हे पोलीस प्रशासनाचे मोठे अपयश आहे. घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक करत त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे मात्र पोलिसांना कसा सापडत नाही, त्याला कोण पाठीशी घालत आहे. असा सवाल उपस्थित करत जरे म्हणाले यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्यांच्यासाठी मात्र आज एकही नेता पुढे आलेला नाही. या हत्याकांडाबाबत जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने विधानसभेत आवाज उठविला नाही. पोलिसांनी बोठे याला तातडीने अटक करून आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणी जरे यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरक्ष आढाव व प्रकाश पोटे यांनी जरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
-----------------
पूजाताईसाठी आवाज उठविता तसे माझ्या आईसाठीही पुढे या
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक नेत्यांनी आवाज उठविला आहे. त्या ताईलाही न्याय मिळणे गरजेचे आहे. माझी आई समाजासाठी लढत होती. तिची हत्या झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपी हा कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनधींनी तरी आता आवाज उठवावा, अशी मागणी यावेळी रुणाल जरे यांनी केली.
-----------------------
तृप्ती देसाई यांचा उपोषणाला पाठिंबा
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जरे कुटुंबीयांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तसेच जरे यांची हत्या करून फरार झालेला आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी तत्काळ अटक करावी, त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी, तसेच बोठे याची मालमत्ता जप्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
----------------------------
फोटो ०५ उपोषण
ओळी- रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याला अटक करावी, या मागणीसाठी जरे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले.