'लोकमत'च्या अपर्णा वेलणकर यांना 'दीनमित्र'कार पत्रकारिता पुरस्कार प्रदान
By सुदाम देशमुख | Updated: December 24, 2023 19:12 IST2023-12-24T17:29:46+5:302023-12-24T19:12:39+5:30
सत्यशोधक चळवळीमध्ये 'दीनमित्र' या पत्राची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केले.

'लोकमत'च्या अपर्णा वेलणकर यांना 'दीनमित्र'कार पत्रकारिता पुरस्कार प्रदान
अहमदनगर : सत्यशोधक पत्रकार 'दीनमित्र' कार मुकुंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा पत्रकारिता पुरस्कार नाशिक येथील ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांना माजी मंत्री व 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आज तरवडी (ता. नेवासा) येथे प्रदान करण्यात आला.
मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक विचाराचा प्रसार करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी येथून ५८ वर्ष ' दीनमित्र' हे नियतकालिक चालविले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सत्यशोधकी विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या पत्रकार व साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीच्या समारंभाला राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार नरेंद्र घुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, सचिव उत्तमराव पाटील, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, साहेबराव घाडगे, ॲड. देसाई देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी वसंत गायकवाड, प्रा. प्रशांत गायकवाड, ललित अधाने, डॉ. हंसराज जाधव, राहुल हांडे, सत्यजित पाटील, सुनील गोसावी, डॉ. राजेंद्र गवळी यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तरवडीसारख्या खेडेगावातून मुकुंदराव पाटील यांनी सत्यशोधक विचार तेवत ठेवला. ही खूप मोठी गोष्ट आहे. सत्यशोधक चळवळीमध्ये 'दीनमित्र' या पत्राची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केले. अपर्णा वेलणकर म्हणाल्या, कुठल्याही साधनाशिवाय ग्रामीण भागातील प्रश्न कसे समजावून घेतले जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण मुकुंदराव पाटील यांनी आपल्या पत्रकारितेतून घालून दिले आहे. त्यामुळे नव्या पिढीतील पत्रकारांनी खुर्च्या सोडून रस्त्यावर व माणसात जाण्याची आवश्यकता आहे.