कोरोना नियंत्रणासाठी उभा राहिली सहाशे डॉक्टरांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:10+5:302021-07-01T04:16:10+5:30

जिल्हा रुग्णालयात पायाभूत सुविधा गोरगरीब जनतेसाठी उभारण्यातही खूप मोठी भूमिका आयएमए अहमदनगर व सभासदांनी पार पाडली. जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ ...

An army of six hundred doctors stood up to control the corona | कोरोना नियंत्रणासाठी उभा राहिली सहाशे डॉक्टरांची फौज

कोरोना नियंत्रणासाठी उभा राहिली सहाशे डॉक्टरांची फौज

जिल्हा रुग्णालयात पायाभूत सुविधा गोरगरीब जनतेसाठी उभारण्यातही खूप मोठी भूमिका आयएमए अहमदनगर व सभासदांनी पार पाडली. जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ सदस्य डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी २० खाटांचा खासगी रुग्णालयांमधील सर्व सुविधा असलेला अतिदक्षता विभाग उभा केला. जवळजवळ ३५ लाख रुपये खर्च करून ही अतिशय उपयुक्त सुविधा निर्माण करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने एआयएमएस हॉस्पिटल ताब्यात घेऊन तिथे कोविड रुग्णांसाठी सुविधा चालू केली. तेथेही आयएमएच्या सभासदांनी पेशंट मॉनिटर्स, सिरींज पंपसारखी उपकरणे उपलब्ध करून दिली. यासाठी सुद्धा मॅककेअर हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल, साईीप हॉस्पिटल, आनंदऋषीजी हॉस्पिटल यांनी हातभार लावला.

कोविड पहिल्या लाटेमध्ये, दुसऱ्या लाटेमध्ये व पूर्वतयारीसाठी संघटनेच्या अहमदनगरचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाबरोबर कायम संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर कायम सल्ला मसलत, उपययोजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात संघटनेने आपले कर्तव्य निभावले.

दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन, इंजेक्शन रेमेडेसिवीरचा भीषण तुटवडा निर्माण झाल्यानंतर महसूल विभागातील अधिकारी व संघटनेचे सभासद डॉक्टर यांच्या संयुक्त समित्या नेमण्यात आल्या. त्यांनी दिवसरात्र नियोजन करून उपलब्ध होणारा ऑक्सिजन पुरवठा समन्यायी पद्धतीने सर्व कोविड रुग्णालयांना कसा उपलब्ध होईल याबाबत काम केले. आमचे सभासद डॉक्टर अक्षरश: एमआयडीसीमध्ये ऑक्सिजन वितरकांच्या युनिटसमोर उभे राहून २४ तास नियोजन करत होते. लोकमत व आयएमए अहमदनगरच्या सहकार्याने डॉक्टरांचा सल्ला नावाचे सदर ‘लोकमत’च्या अहमदनगर पुरवणीमध्ये चालवण्यात आले. यामध्ये कोविड आजाराविषयी, त्याच्या प्रतिबंधाविषयी, लसीकरणाविषयी अतिशय विश्वासार्ह माहिती जनतेला देऊन प्रबोधनाचा खूप छान उपक्रम राबवण्यात आला. अशाच प्रकारे रुग्ण प्रबोधनासाठी माहिती वेळोवेळी समाजमाध्यमांमध्ये आयएमए अहमदनगरतर्फे प्रसारित करण्यात येते. बऱ्याच तज्ज्ञांद्वारे कोविडच्या तिसऱ्या लाटेबद्दल भाकीत वर्तवले असल्याने आयएमए अहमदनगर व जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी चालू केलेली आहे.

लहान मुलांमध्ये कोविडचे रुग्ण जर आढळल्यास त्यांच्या उपचारासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा जिल्हास्तरीय टास्क फोर्स मा. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेला आहे. या टास्क फोर्सने सुचवल्यानुसार जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, तालुका रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. तसेच जिल्हास्तरीय सर्व बालरोगतज्ञ, सरकारी वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी, नर्सेस अशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा युद्धपातळीवर चालू आहेत.

--------------------

आयएमए अहमदनगरचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. सागर झावरे, खजिनदार डॉ. गणेश बडे, उपसचिव डॉ. अशोक नरवडे, डॉ. रामदास बांगर, डॉ. अमित करडे यांनी अत्यंत मौल्यवान व समाजोपयोगी कामगिरी केलेली आहे.

कोविडचे संकट अजूनही टळलेली नाही. आणि आयएमए अहमदनगर नगरकरांच्या सेवेत काल, आज व उद्या सदैव तत्पर राहणार यात शंका नाही. मास्क वापरा, गर्दी टाळा व सॅनिटाइजरचा वापर करा.

-डॉ. अनिल आठरे, डॉ. सचिन वहाडणे, आयएमए. अहमदनगर

Web Title: An army of six hundred doctors stood up to control the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.