नगरमध्ये पहिल्यांदाच रंगणार लष्कराची सायकल पोलो स्पर्धा; १९ ते २१ मार्चदरम्यान आर्मर्ड कोअरमध्ये आयोजन
By चंद्रकांत शेळके | Updated: March 18, 2023 20:12 IST2023-03-18T20:12:32+5:302023-03-18T20:12:42+5:30
एसीसी अँड एसमधील आर्मी स्पोर्ट्स नोड येथे पत्रकारांना याविषयी माहिती देण्यात आली.

नगरमध्ये पहिल्यांदाच रंगणार लष्कराची सायकल पोलो स्पर्धा; १९ ते २१ मार्चदरम्यान आर्मर्ड कोअरमध्ये आयोजन
अहमदनगर: पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्रात अहमदनगर शहरामध्ये पहिल्यांदाच भारतीय लष्कराने आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो चषकाचे आयोजन केले आहे. १९ ते २१ मार्चदरम्यान ही स्पर्धा नगरमध्ये होणार आहे. ही स्पर्धा लष्कराच्या एसीसी अँड एसमधील पोलो ताल मैदानावर आयोजित केली जाणार आहे.
शनिवारी एसीसी अँड एसमधील आर्मी स्पोर्ट्स नोड येथे पत्रकारांना याविषयी माहिती देण्यात आली. या स्पर्धेमध्ये केवळ लष्करातील सर्वोत्तम सायकल पोलो खेळणारे संघ सहभागी होणार आहेत. तसेच ही स्पर्धा सीपीएफआयच्या अधिकाऱ्यांना आगामी सायकल पोलो विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी मदत करेल. या स्पर्धेत भारतीय वायूसेनेचा सायकल पोलो संघ, भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स आणि प्रादेशिक सेना एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.
सीपीएफआयचे अधिकारी आणि तीनही संघांचे कर्णधार यांनी ही माहिती दिली. कार्यक्रम व्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यावेळी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी भारतीय सशस्त्र दल नेहमीच आघाडीवर असते. आपल्या देशाच्या सायकल पोलो संघाने सायकल पोलो विश्वचषक स्पर्धेत ६ वेळा सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उंचावले आहे. एक राष्ट्र म्हणून आम्ही सशस्त्र दलांमध्ये जे खेळाडू घडवतो, त्यांच्या कौतुकासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा होईल.
सायकल पोलो फेडरेशनचे मुख्य अधिकारी के. के. सोनी म्हणाले की, महाराष्ट्रात अहमदनगरला पहिल्यांदाच हा अनोखा खेळ अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची पारख होणार आहे. यात भारतीय वायूसेनेच्या संघाचे नेतृत्व जेडब्ल्यूओ विष्णू एस. करतील. भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स संघाचे नेतृत्व लेफ्ट्नंट पीयूष कुमार सिन्हा करतील, तर प्रादेशिक लष्कराच्या संघाचे नेतृत्व सनोफर करतील, असेही यावेळी सांगण्यात आले.