देवळाली प्रवरा बसस्थानकास मंजुरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:15+5:302021-03-24T04:18:15+5:30
राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरासाठी अद्ययावत एस.टी. बसस्थानकास मंजुरी द्यावी. जवळपासच्या श्रीरामपूर, राहुरी आणि ३२ गावांना शैक्षणिक आणि ...

देवळाली प्रवरा बसस्थानकास मंजुरी द्या
राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरासाठी अद्ययावत एस.टी. बसस्थानकास मंजुरी द्यावी. जवळपासच्या श्रीरामपूर, राहुरी आणि ३२ गावांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने जोडण्यासाठी शटल बससेवा सुरू करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ई-मेलद्वारे केली आहे.
देवळाली प्रवराची जवळपास ३५ हजार लोकवस्ती आहे. ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. जवळपासच्या ३२ गावांना जोडलेले महसूल मंडलाचे मोठे शहर आहे. देवळाली प्रवरा शहर हद्दीत विविध शाळा, कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, अध्यापक महाविद्यालयांसारख्या विविध शिक्षणसंस्था आहेत. या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी बाहेरगावांहून दररोज देवळाली प्रवरा येथे येतात. परंतु देवळाली प्रवरा येथून सायंकाळी श्रीरामपूर तसेच राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी, येण्यासाठी एस.टी.बससेवा उपलब्ध नाही. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी या ठिकाणी अद्ययावत असे एस.टी. बसस्थानक व्हावे म्हणून कित्येक वर्षांची मागणी आहे. तसेच देवळाली प्रवरा येथे शटलबस सेवा सुरू केली तर येथील लहान उद्योगांना, व्यावसायिकांना चालना मिळेल. उद्योग वाढतील व एस.टी. महामंडळालाही त्याचा फायदा होईल, असेही ढूस यांनी पत्रात म्हटले आहे.