पाथर्डीत ग्रामसमृद्धी योजनेच्या ३६ प्रस्तावांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:37+5:302021-05-23T04:21:37+5:30
तिसगाव : महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठा योजनेच्या ३६ प्रस्तावांना पहिल्या टप्प्यात ...

पाथर्डीत ग्रामसमृद्धी योजनेच्या ३६ प्रस्तावांना मंजुरी
तिसगाव : महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठा योजनेच्या ३६ प्रस्तावांना पहिल्या टप्प्यात पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणारा बैठा सत्याग्रह रद्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते आसाराम ससे यांनी दिली.
सामूहिक व वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व घटक गावे समृद्ध करण्याच्या उद्देशाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविली जात आहे. त्या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांसाठी गाय गोठा उभारणी योजना हाती घेण्यात आली आहे. तालुक्यातून हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीकडे दाखल झाले होते. तालुका प्रशासनाने प्रस्ताव मंजूर केले नव्हते. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयासमोर माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत पवार व शिवसेनेच्या महिला तालुका संघटक सविता ससे यांच्या माध्यमातून बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ३६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रस्तावांना मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत ससे यांनी सांगितले की, ही योजना खरोखर शेतकऱ्यांच्या खूप फायद्याची असून यातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे ही योजना फक्त कागदावर न राहता सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे.