शहरटाकळी पोलीस दूरक्षेत्राला कर्मचारी नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:43+5:302021-03-05T04:20:43+5:30
दहीगावने : शेवगाव तालुक्यातील दहीगावने गटातील शहरटाकळी येथे दोन वर्षांपासून पोलीस दूरक्षेत्र आहे; मात्र येथे पोलीस कर्मचारीच उपलब्ध नसतात. ...

शहरटाकळी पोलीस दूरक्षेत्राला कर्मचारी नेमा
दहीगावने : शेवगाव तालुक्यातील दहीगावने गटातील शहरटाकळी येथे दोन वर्षांपासून पोलीस दूरक्षेत्र आहे; मात्र येथे पोलीस कर्मचारीच उपलब्ध नसतात. सध्या या परिसरात चोरांचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे येथे किमान रात्री तरी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याकडे केली आहे.
शहरटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी पोलीस ठाण्याच्या मागणीनुसार दूरक्षेत्रासाठी सुसज्ज ऑफिस तयार करून दिलेले आहे; परंतु वर्षभरापासून हे दूरक्षेत्र बंद आहे. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे हे दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती आहे. सध्या शहरटाकळी व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, भरचौकातील मोबाइल शॉपी चोरांनी लुटली. शेतातून वीज केबलही चोरीला गेले. ही सर्व परिस्थिती व ग्रामस्थांचे निवेदन लक्षात घेता किमान रात्री दोन पोलीस कॉन्स्टेबल शहरटाकळी दूरक्षेत्राला कायम ठेवण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर बाजार समितीचे सभापती अनिल मडके, सरपंच अलकाबाई शिंदे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप राजळे, प्रशांत वेलदे, संतोष शेटे, देविदास दगडे आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
--
दहीगावने गटातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहरटाकळी मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने येथे किमान रात्रीसाठी दोन पोलीस कॉन्स्टेबलची कायमस्वरूपी नेमणूक त्वरित करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
-अनिल मडके,
सभापती, बाजार समिती, शेवगाव
---
०४ शहरटाकळी
शहरटाकळी येथील पोलीस दूरक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीचे निवेदन नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना दिले.