‘त्या’ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:09+5:302021-05-04T04:10:09+5:30
येथील अशोक साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ५ मे २०२० रोजी संपली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम ...

‘त्या’ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त करा
येथील अशोक साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ५ मे २०२० रोजी संपली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम दोन वेळा स्थगित करण्यात आला होता. यादरम्यान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्या आनुषंगाने शेतकरी संघटनेचे नेते ॲड. अजित काळे, अनिल औताडे, युवराज जगताप, विष्णुपंत खंडागळे यांनी सहकार विभागाकडे प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे. अशोकसह राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. मात्र उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम मार्च २०२० मध्ये राज्य सरकारने स्थगित केला होता. सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ७३ अ अ अ व ७३ सीबीमध्ये दुरुस्ती करून सरकारने त्यानंतर जुलै २०२०मध्ये पुन्हा हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला होता.
या दुरूस्तीनंतर सहा महिन्यांनंतर म्हणजेच मार्च २०२१ नंतर सरकारला कोणत्याही संस्थेच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देता येत नाही. त्यामुळे या पुढील काळासाठी अशा संस्थांवर प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी ॲड. अजित काळे यांनी केली आहे. सरकारने संचालक मंडळाला मुदतवाढ देऊन बेकायदेशीर प्रक्रिया राबविल्यास, त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.