जेऊर परिसराला आले चिपळूणचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:12+5:302021-09-02T04:46:12+5:30
नगर तालुक्यात सात मंडलात अतिवृष्टी : सीना नदीला महापूर ; लाखो रुपयांचे नुकसान : प्रशासनाकडून परिस्थितीची पाहणी केडगाव : ...

जेऊर परिसराला आले चिपळूणचे स्वरूप
नगर तालुक्यात सात मंडलात अतिवृष्टी : सीना नदीला महापूर ; लाखो रुपयांचे नुकसान : प्रशासनाकडून परिस्थितीची पाहणी
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात सोमवारी (दि. ३०) ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः हाहाकार घातला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जेऊर परिसराला चिपळूणचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान नगर तालुक्यात सात मंडलात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेऊर परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
जेऊर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने सीना व खारोळी नदीला महापूर आला होता. सीना नदीचे पाणी जेऊर बाजारपेठेत तसेच गावामध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जेऊर गावची मुख्य बाजारपेठ पाण्यामध्ये होती. अनेक दुकानदारांचे साहित्य तर काही दुकाने वाहून गेली आहेत. सर्वच व्यावसायिकांना पुराचा फटका बसला असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. संतुकनाथ विद्यालयाचा पूल देखील वाहून गेला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर सीना नदीचे पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चार तास महामार्ग बंद होता. सीना नदीच्या पुलावरुन पाणी गेल्याने महामार्ग बंद राहण्याची पहिलीच वेळ असल्याने पुराच्या पाण्याचा अंदाज येतो. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर व जेऊर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून अंतर्गत रस्ते वाहून गेले आहेत. नदीच्या पुरामुळे ससेवाडी, तोडमलवाडी, चापेवाडी, शेटे वस्ती येथील नागरिकांचा संपर्क तुटला होता. जेऊर बाजारपेठेत झालेल्या नुकसानीचे खूपच विदारक चित्र पहावयास मिळत होते.
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, मंडलाधिकारी वृषाली करोसिया यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, सरपंच राजश्री मगर व सर्व सदस्यांनी तसेच अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे, माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी नुकसान झालेल्या व्यावसायिकांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
...........................
मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात
जेऊर गावची मुख्य बाजारपेठ अतिक्रमणात वसलेली आहे. अतिक्रमण हटविण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी ग्रामपंचायतला दिलेले आहेत. परंतु अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई झालेली नाही. भविष्यात येथे मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते. तरी प्रशासनाने जेऊर गावातील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
...............
तलाव फुटण्याची अफवा
ससेवाडी व बहिरवाडी येथील वाकी तलाव तसेच बंधारे तुडुंब भरले असून ते तलाव फुटण्याची अफवा जेऊर गावामध्ये पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सर्व तलाव सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
.............