कोळपेवाडी दरोड्यातील आणखी एका आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 10:46 IST2018-09-11T10:46:16+5:302018-09-11T10:46:30+5:30
तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते.

कोळपेवाडी दरोड्यातील आणखी एका आरोपीला अटक
कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते. यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ९ वा आरोपी सुंदरलाल रंधवा भोसले (रा. हिंगणी, ता. कोपरगाव) याला रविवारी पोलिसांनी सापळा लावून हिंगणी येथून ताब्यात घेतले.
कुप्रसिद्ध पपड्या गँगने हा दरोडा टाकल्याचे पोलिसात निष्पन्न झाले होते. यातील सर्व ९ आरोपींची ओळख परेड झाली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी दिली.
आरोपी सुंदरलाल भोसले यास जेरबंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष शेळके, सहायक फौजदार संजय पवार, पोलीस हवालदार इरफान शेख, सुरेश पवार, अरविंद गुंजाळ, पोलीस नाईक अशोक शिंदे, असिर सय्यद, धनंजय महाले आदींच्या पथकाने कारवाई केली.