मोरया चिंचोरेतील ३६५ दिवस वृक्षारोपण उपक्रमाची वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:32+5:302021-08-22T04:25:32+5:30
नेवासा : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून मोरया चिंचोरे गावात विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. यातून ...

मोरया चिंचोरेतील ३६५ दिवस वृक्षारोपण उपक्रमाची वर्षपूर्ती
नेवासा : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून मोरया चिंचोरे गावात विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. यातून मोरया चिंचोरे गावाची आदर्श गाव अशी ओळख झाली आहे. २१ ऑगस्ट २०२० रोजी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सदाहरित गाव अशी ओळख व्हावी म्हणून वर्षातील ३६५ दिवस वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाची वर्षपूर्ती शनिवारी (दि.२१) झाली.
या उपक्रमास नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातून नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. वर्षभर येथे ४८५ व्यक्तींनी वाढदिवस साजरा करत वृक्षारोपण केले. तसेच २२ शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी वर्षभरात पाच हजार वृक्षांचे रोपण केले. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त येथे झाडांचा वाढदिवस व स्नेह फाउंडेशन सोनई यांच्या वतीने अकराशे झाडांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते उदयन गडाख, डॉ. सचिन पुणेकर, शैलेंद्र पटेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सरपंच जयश्री मंचरे, स्नेह फाउंडेशनचे संगीता पिसाळ-जोरवर, संजय गर्जे आदींचा यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. मोरया चिंचोरे येथील दारूबंदीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या ठकन आल्हाट या युवकाचा यावेळी वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.
----
२१ मोरया चिंचोरे
मोरया चिंचोरे येथे झाडांचा वाढदिवस साजरा करताना उदयन गडाख, डॉ. सचिन पुणेकर, शैलेंद्र पटेल आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य, शालेय विद्यार्थी.