अण्णांनी घेतला समाजसेवेचा क्लास

By Admin | Updated: June 7, 2014 00:17 IST2014-06-06T23:08:35+5:302014-06-07T00:17:26+5:30

अहमदनगर : लोकसहभाग कसा वाढवायचा, त्यासाठी आत्मसात करावे लागणारे तंत्र आणि काम टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या पंचसूत्रीचा कानमंत्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवसमाजसेवकांना दिला.

Anna took the class of social service | अण्णांनी घेतला समाजसेवेचा क्लास

अण्णांनी घेतला समाजसेवेचा क्लास

अहमदनगर : लोकसहभाग कसा वाढवायचा, त्यासाठी आत्मसात करावे लागणारे तंत्र आणि काम टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या पंचसूत्रीचा कानमंत्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवसमाजसेवकांना दिला. तसेच कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. अण्णांची ही गुरूवाणी नवसमाजसेवकांनी कानात प्राण आणून ऐकली आणि गावात तसेच काम उभे करण्याचा संकल्पही सोडला.
आदर्श गाव हिवरे बाजार येथे वन विभागाने आणलेल्या ग्रामवन या नवीन कायद्याच्या माहिती तसेच प्रशिक्षणासाठी राज्यातील २० गावांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी नक्षत्र वनात हजारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
खुद्द अण्णा समाजसेवेचे धडे देत आहे म्हटल्यावर विविध गावांतून आलेल्या समाजसेवकांचा आनंद द्विगुणित झाला. आपण कसे वागतो, काय बोलतो, काय खातो याकडे लोकांचे लक्ष असते. त्यामुळे शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग, अपमान पचविण्याची ताकद या पंचसूत्रींचा अवलंब करा. लोकांसाठी जगण्यातच खरा आनंद असतो. तसे केल्यानेच मी माझ्याजवळ काही नसताना आनंदी आहे.
गावात काम करीत असताना नम्रता असली पाहिजे. लीनतेशिवाय काम उभेच राहू शकत नाही. मी अध्यक्ष, हा उपाध्यक्ष, तो सचिव या पदात अडकला तर कामाचा काहीच उपयोग नाही.
केवळ उपदेश करून काम होत नसते. त्याला कृतीची जोड हवीच. गावात काम करीत असताना देश डोळ्यासमोर ठेवा, मी तेच केले म्हणून काम उभे राहू शकले. मी कोणत्या सभागृहाचा सदस्य नाही पण मला विचारल्याशिवाय ते काम करीत नाहीत, हीच तुमच्या कामाची ताकद आहे, असे ते म्हणाले.
कायदे नसताना मी आणि पोपटरावने काम केले. आता नवीन कायद्यानुसार ग्राम समितीला अधिकार मिळाले आहेत. या विकेंद्रीकरणामुळे जंगलातील उत्पन्न गावाला मिळू शकते. त्यावेळी कोणी चेअरमन व्हायचे यासाठी भांडणे लागू शकतात, ते टाळायला हवे, असेही अण्णा म्हणाले. (प्रतिनिधी)
कॅमेऱ्यापासून दूर रहा
गावात थोडेफार काम उभे राहिले तरी त्याची प्रसिद्धी केली जाते. यामुळे काहीजण नाराज होतात. त्यामुळे कॅमेऱ्याच्या चौकटीपासून दूरच रहा. मी एवढे काम उभे केले. परंतु कधी प्रेस घेतली नाही. मीडियाला पटले तर ते आपोआप गावात येतात, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाही.

Web Title: Anna took the class of social service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.