सोळा दिवसांचा देशव्यापी दौरा करुन अण्णा परतले राळेगणसिद्धीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:14 IST2017-12-25T21:12:15+5:302017-12-25T21:14:00+5:30
लोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले.

सोळा दिवसांचा देशव्यापी दौरा करुन अण्णा परतले राळेगणसिद्धीत
राळेगणसिद्धी : लोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले.
लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी, शेतक-यांचे प्रश्न सुटावेत, निवडणुकीतील सुधारणा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. २३ मार्चपासून दिल्लीत अण्णांचे आंदोलन सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांनी ९ डिसेंबरपासून देशव्यापी दौरा सुरु केला होता. या दौºयात अण्णांनी तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यात सभा घेऊन शेतकरी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच या भागातील कोअर टिमशी पुढील आंदोलनाबाबत अण्णांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान सोमवारी (दि.२५) सायंकाळी अण्णा हा सोळा दिवसांचा दौरा संपवून राळेगणसिद्धीत परतले. यावेळी अण्णांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अण्णा राळेगणसिद्धीत येणार असल्याचे समजताच राज्यभरातील अनेक कार्यकर्ते सोमवारी राळेगणसिद्धीत दाखल झाले.