अतिवृष्टीने जनावरे मृत्युमुखी, जीव वाचविण्यासाठी माणसांनी सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:17+5:302021-09-02T04:45:17+5:30
पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, सोमठाणे, प्रभूपिंपरी परिसरात जोरदारपणे पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नदीकाठच्या घराचे ...

अतिवृष्टीने जनावरे मृत्युमुखी, जीव वाचविण्यासाठी माणसांनी सोडले घर
पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, सोमठाणे, प्रभूपिंपरी परिसरात जोरदारपणे पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नदीकाठच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून, गोठ्यातील जनावरे वाहून जाऊन मृत पावली, तर काहीजण जीव वाचविण्यासाठी रात्रीच्या पावसातच घर सोडून सुरक्षितस्थळी पोहोचले.
नदीच्या पुरामुळे वाडी-वस्तीचा संपर्क तुटला आहे. नदीकाठी राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १६ कुटुंबांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पावसातच लहान मुलांसह घर सोडत आपला जीव वाचविला. पुराच्या पाण्याने काही ठिकाणी रस्ते वाहून गेले. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र जागून काढली. परिसरात कपाशी, तूर, ऊस, सोयाबीन, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांच्या राहत्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.
..........
राजळे, ढाकणे यांनी केली पाहणी
आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, जि. प. सदस्य शिवशंकर राजळे, ऋषिकेश ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच नुकसान झालेल्या घटनेचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरे पाण्यात गेली आहेत. बचाव पथके नसल्याने अडचण होत आहे. बचावकार्यासाठी पुणे, पैठण येथून बोट मागविण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. नदीला पाणी आल्याने प्रभू पिंपरी परिसरात शेकडो घरात पाणी शिरल्याने असंख्य कुटुंबे अडचणीत आहेत.
...................