अहमदनगर : शासनाने अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजासाठी दिलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असून ते वारंवार नादुरुस्त होतात. त्याचा दुरुस्तीचा खर्चही अधिक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका हे मोबाइल शासनाला परत करणार असल्याचा इशारा राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०१९मध्ये राज्यातील १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाइल वाटप करण्यात आले होते. या मोबाइलची वॅारंटी दोन वर्षे कालावधीची असून तो कालावधी मे २०१९ मध्ये संपला आहे. मोबाइलमध्ये लाभार्थींची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यात येते. या मोबाइलची रॅम केवळ २ जीबी आहे. त्यामुळे तो स्पेस पटकन भरतो व मोबाइल हँग होतो. हे मोबाइल सातत्याने नादुरुस्त होत असल्याने दुरुस्तीसाठी ३ ते ८ हजारांचा खर्च येतो व तो अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातो.
याशिवाय केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे. परंतु हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खासगी मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड करावे लागते. हे ॲप इंग्रजीमध्ये असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना इतरांची मदत घ्यावी लागते. त्यात मराठीचीही सोय नाही. अशा अनेक अडचणींचा सामना करत अंगणवाडी सेविका काम करत आहेत. परंतु शासन कोणतीही दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी १७ ॲागस्टपासून मोर्चाने प्रकल्प कार्यालयात जाऊन सर्व मोबाइल परत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, शुभा शमीम, भगवान देशमुख, कमल परुळेकर, जयश्री पाटील, सुवर्णा तळेकर आदींनी दिली.