... अन् भारताच्या खडबडीत रस्त्यांवर धावल्या नगरच्या लुना
By Admin | Updated: May 16, 2016 00:08 IST2016-05-15T23:58:06+5:302016-05-16T00:08:39+5:30
अहमदनगर : परदेशी कंपनीचा कुठलाही पार्ट व मशीन वापरायचे नाही. ही ‘लुना’नगरलाच बनवायची. तिचे वजन पन्नास किलो तर किंमतही दोन हजाराच्या आत हवी, अशा विविध अटी वडिलांनी आपणाला टाकल्या होत्या.

... अन् भारताच्या खडबडीत रस्त्यांवर धावल्या नगरच्या लुना
अहमदनगर : परदेशी कंपनीचा कुठलाही पार्ट व मशीन वापरायचे नाही. ही ‘लुना’नगरलाच बनवायची. तिचे वजन पन्नास किलो तर किंमतही दोन हजाराच्या आत हवी, अशा विविध अटी वडिलांनी आपणाला टाकल्या होत्या. अवघे पंधरा लाखांचे भांडवल त्यासाठी दिले होते. हे सगळे आव्हान आपण स्वीकारले व ‘लुना’ बनवली. नगरची व कायनेटिकची हीच लुना भारताच्या खडबडीत रस्त्यांवरुन सुसाट धावली, अशा ‘लुना’च्या आठवणी कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया यांनी ‘लोकमत’च्या समारंभात उलगडल्या.
‘लोकमत बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’ या समारंभात फिरोदिया बोलत होते. ते म्हणाले, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादन केले तर आपण उद्योगात यशस्वी होऊ शकतो. यासाठी त्यांनी ‘लुना’चे उदाहरण दिले. मी अमेरिकेत एका कंपनीत नोकरी करत असताना वडिलांच्या सल्ल्यानुसार भारतात आलो़
वडिलांच्या सूचनेनुसार नगरला लुनाचे उत्पादन सुरु केले. नवीन वाहन बाजारात आणत असताना ते कसे असावे, हे समजून घेणे गरजेचे होते़ त्यासाठी ठिकठिकाणी दुचाकीचे मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्यांचे सल्ले घेतले़ एकाने सांगितले, अनेकजण इंधनात रॉकेल वापरतात. त्यामुळे इंजिनमध्ये मोठा कार्बन जमा होऊन वाहन मेंटेनन्स वाढतो. त्यामुळे लुनाचे इंजिन उलटे बसवा. त्यामुळे लुनात तसा बदल केला.
एक ग्राहक म्हणाला, खडबडीत रस्त्यांमुळे दुचाकी सतत पंक्चर होते. त्यामुळे चाक न खोलता लुनाचा पंक्चर काढता यायला हवा. तसाही बदल केला. दुचाकीचे इंजिन खोलल्यानंतर सर्वच वस्तुंचा मेंटेनन्स निघतो. त्यामुळे ‘लुना’चा गिअरबॉक्स, क्लच व मशीन वेगळे ठेवण्याचा सल्ला एका फिटरने दिला. हाही बदल आम्ही स्वीकारला. ग्राहक मागणी करतील तसे प्रयोग मी करत गेलो. त्याच जोरावर पन्नास लाख लुना विकल्या.
इटलीमधील एका कंपनीत गेलो तेव्हा तेथील ‘आर अॅण्ड डी’ विभागात मला लुना दिसली. आमची लुना येथे कशी? म्हणून मी आश्चर्यचकित झालो. बाजारात दरवर्षी नव्याने येणारी लुना आम्ही येथे घेऊन येतो व त्यावर संशोधन करतो़, असे त्या कंपनीचे म्हणणे होते. भारतातील रस्ते अतिशय खडबडीत आहेत़, पेट्रोलमध्ये भेसळ आहे, तरीही या रस्त्यावर तुमची लुना व्यवस्थित चालते़, वजन ओढते आणि मेंटेनन्स काढत नाही, याचे त्या कंपनीला नवल वाटत होते.
सदानंद जोशींमुळे अमेरिका समृद्ध
महाराष्ट्रीयन माणूस उद्योगात पहिल्यापासून अग्रेसर आहे़ त्यांचा इतिहास मात्र, आपल्यापर्यंत पोहोचला नसल्याची खंत फिरोदिया यांनी व्यक्त केली़ ते म्हणाले, राईट बंधुंनी पहिले विमान उडविल्याचे सांगितले जाते़ प्रत्यक्षात मात्र, मुंबई येथे शिवरत्न बापूजी तळपदे या महाराष्ट्रातील व्यक्तीने पहिले विमान उडविले.भारतात इंग्रजांनी पहिल्यांदा रेल्वे आणली, असे सांगितले जाते़ इंग्रजांच्या आधी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनी मुंबईत रेल्वे आणली आणि ती सुरू केली़ इंग्रजांनी याला प्रथम विरोध केला़ मात्र, रेल्वेचा उपयोग पाहून त्यांनी भारतात रेल्वेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला़ जगात कॅमेऱ्याचा शोध लागल्यानंतर चार वर्षांतच मुंबईच्या धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके यांनी भारतात प्रथम चित्रपट निर्मिती केली़ मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलच्या इमारतीचे डिझाईन महाराष्ट्रातील सखाराम वैद्य याने केलेले आहे़ सदानंद जोशी या महाराष्ट्रातील युवकाने अमेरिकेत नोकरी करत असताना तेथील वाळवंटातून कशी तेल निर्मिती करता येईल, याचा शोध लावला़ एकेकाळी आखाती देशातून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारी अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली़ या नव्या शोधामुळे जगात तेलाचे दर झपाट्याने कमी झाले़ हे महाराष्ट्राच्या सदानंदचे योगदान असल्याचे फिरोदिया यांनी यावेळी सांगितले़