नगर तालुक्यातील पुरातन राममंदिरे या वर्षीही ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:39+5:302021-04-21T04:21:39+5:30
केडगाव : श्रीराम नवमीनिमित्ताने होणारे मोठे धार्मिक कार्यक्रम, रामकथांचे सोहळे यंदाही कोरोनामुळे होऊ शकणार नाहीत. रामनवमीला भक्तांच्या गर्दीने फुलून ...

नगर तालुक्यातील पुरातन राममंदिरे या वर्षीही ओस
केडगाव : श्रीराम नवमीनिमित्ताने होणारे मोठे धार्मिक कार्यक्रम, रामकथांचे सोहळे यंदाही कोरोनामुळे होऊ शकणार नाहीत. रामनवमीला भक्तांच्या गर्दीने फुलून जाणारी नगर तालुक्यातील पुरातन राममंदिरे यंदाही ओस पडली आहेत. सलग दुसऱ्या वर्षी रामभक्तांना दर्शनापासून विन्मुख रहावे लागणार आहे.
नगर तालुक्यात वाळकी, दहिगाव, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, चास, नेप्ती आदी ठिकाणी पुरातन राममंदिरे आहेत. वर्षभर रामनवमीच्या कार्यक्रमांची प्रतीक्षा करणारे ही गावे सध्या कोरोना महामारीमुळे सामसूम झाली आहेत. मागील वर्षी कोरोनाचा २१ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्यावेळीही ऐन रामनवमीत मंदिरे न उघडल्याने रामभक्तांना रामाच्या दर्शनासाठी वर्षभर वनवास सहन करावा लागला. यावेळी मोठ्या उत्सवात रामनवमी साजरी करण्याचे नियोजन या गावातील भक्तांनी सुरू केले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने व लॉकडाऊन लागल्याने यावर्षीही फक्त पुजारी रामाचे पूजन करणार असून भाविकांसाठी मंदिरे बंद असणार आहेत.
दहिगाव येथील राममंदिर ७०० वर्षांपूर्वीचे असून हेमाडपंथी मंदिरात रामाची सुबक मूर्ती आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली असे सांगितले जाते. वाळकी येथील राममंदिर प्रसिद्ध आहे. रामनवमीची तयारी महिनाभर आधीच सुरू होते. रामायणाचार्य यांच्या रामकथांनी गावात भक्तिमय वातावरण तयार होते. पिंपळगाव माळवी येथे पुरातन राममंदिर आहे. हे मंदिर या गावाचे आराध्य दैवत आहे. रामनवमीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. डोंगरगण येथे प्रभू रामाने आपल्या वनवासातील काही दिवस व्यतीत केले, अशी आख्यायिका आहे. येथे रामनवमीला राज्यभरातून भाविक येतात. तालुक्यातील नेप्ती व चास येथे प्रसिद्ध राममंदिरे आहेत. मात्र कोरोनामुळे या मंदिरांना कुलपे लागली आहेत.
..........
रामनवमी म्हणजे वाळकीकरांच्या आनंदाला भरते येते. महिन्यापासून तयारी सुरू होते. गावात अयोध्येसारखे वातावरण तयार होते. रामनवमीला २o ते २५ हजार भाविक येतात. यंदा कोरोनामुळे सर्व काही ठप्प आहे.
- दिलीप भालसिंग, वाळकी
..............
प्रभू रामाने आपल्या वनवास काळातील काही दिवस डोंगरगणमध्ये वास्तव्य केले. यामुळे भाविक रामनवमीला येथे गर्दी करतात. यावेळी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम स्थगित आहेत.
- कैलास पटारे, डोंगरगण
..........
रामनवमीला गावात उत्सव असतो. यंदा मंदिर व कार्यक्रम बंद असल्याने गावाचे चैतन्य हरवल्यासारखे वाटते.
- संजय जपकर, नेप्ती
............
फोटो -
१) दहिगाव येथील पुरातनकालीन राममंदिर.
२) वाळकी येथील प्रसिद्ध राममंदिर.