Ahilyanagar Crime: अमेरिकेतील महिलेची १४ कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अहिल्यानगरच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेशात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अहिल्यानगर शहरातील एका ३१ वर्षीय तरुणाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तोफखाना पोलिसांच्या मदतीने बुधवारी अटक केली आहे. अभिजित संजय वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमेरिकेतील एका महिलेची फसवणूक केल्याचा गुन्हा आंध्र प्रदेशातील मंगलागिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या महिलेचे वडील आंध्र प्रदेशातील आहेत. हा तपास हाती घेत आंध्र प्रदेशातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी यापूर्वी तीन जणांना अटक केली आहे. क्रिप्टो करन्सीद्वारे ही फसवणूक करण्यात आली होती. यातील १४ कोटी १८ लाख एवढी रक्कम आरोपी वाघमारे याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले. वाघमारे याच्या शोधासाठी आंध्र प्रदेशातील एक पथक बुधवारी अहिल्यानगर शहरात दाखल झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याशी त्यांनी संपर्क केला. त्यानंतर आरोपी वाघमारे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली.