कोरोनाग्रस्त महिलेसह रुग्णवाहिका पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:15+5:302021-04-21T04:21:15+5:30
रुग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे (रा. कवडदरा, साकूर, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा ...

कोरोनाग्रस्त महिलेसह रुग्णवाहिका पळविली
रुग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे (रा. कवडदरा, साकूर, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील जेल रस्ता परिसरातील एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेला तिचे नातेवाईक रुग्णवाहिकेतून (एम. एच. १५., डी. के. ६०६०) उपचारांसाठी पुण्याला घेऊन जात होते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारातील लक्ष्मी ढाब्यावर रुग्णवाहिका चालक जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेला, तर कोरोनाग्रस्त महिलेचे नातेवाईक लघुशंकेसाठी गेले. या संधीचा फायदा घेत आरोपी पांडे याने रुग्णवाहिका पळवून नेली. यावेळी चालक व नातेवाइकांनी आरडाओरड सुरू केली. त्यांनी तात्काळ घारगाव पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना सांगितला.
पाटील यांनी रुग्णवाहिका मालकांशी फोनद्वारे संपर्क केला. मालकाने जीपीएस प्रणालीद्वारे रुग्णवाहिका संगमनेरच्या दिशेने जात असल्याचे त्यांना सांगितले. पाटील यांनी याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना कळविले. जीपीएसप्रणालीमुळे रुग्णवाहिका कुठे आहे हे पोलिसांना समजत होते. पोलीस रुग्णवाहिकेचा पाठलाग करीत असताना संगमनेर शहरातील नाटकी भागात पोलीस व नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला पकडले.
रुग्णवाहिका चालक रोंगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव पांडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस नाईक राजेंद्र लांघे तपास करीत आहेत.
--------
महिलेवर पुण्यातील रुग्णालयात उपचार
या प्रकारामुळे रुग्णवाहिकेतील कोरोनाग्रस्त वयोवृद्ध महिला या प्रकाराने चांगलीच घाबरली होती. पोलिसांनी तिला धीर दिला. यामुळे महिलेला उपचार मिळण्यास विलंब झाला. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात या महिलेस रुग्णवाहिकेतून उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे रुग्णवाहिका चालक योगेश रोंगटे यांनी सांगितले.